सोनियाजींच्या भेटीसाठी केली चार किमीची पदयात्रा

By Admin | Updated: October 11, 2014 23:09 IST2014-10-11T23:09:10+5:302014-10-11T23:09:10+5:30

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रचारसभा गोंदियाच्या सर्कस मैदानावर शनिवारी झाली. या सभेसाठी जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांनीही हजेरी लावली.

A four km walk to meet Soniaji | सोनियाजींच्या भेटीसाठी केली चार किमीची पदयात्रा

सोनियाजींच्या भेटीसाठी केली चार किमीची पदयात्रा

गोंदिया : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रचारसभा गोंदियाच्या सर्कस मैदानावर शनिवारी झाली. या सभेसाठी जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांनीही हजेरी लावली. सोनिया गांधी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी गोंदिया शहराच्या चारही मार्गावरील रस्ते शहराबाहेर चार किलोमीटर अंतरावर जड वाहनांसाठी बंद केले. त्यामुळे या सभेसाठी येणाऱ्या लोकांना चार किमीची पदयात्रा करून उपस्थिती दर्शवावी लागली.
गोंदिया, आमगाव, अर्जुनी/मोरगाव व तिरोडा या चारही विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी रस्ते बंद केल्यामुळे वाहनाने आलेल्या लोकांना शहराच्या चार किमी अंतरावरच ठेवून तेथून पायी सर्कस मैदानावर यावे लागले.
पोलिसांनी सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सर्कस मैदानावर जाणारे सर्व रस्ते सोनियाजी येण्याच्या दोन तास अगोदरच बंद करण्यात आले होते. त्या रस्त्यावरून चारचाकी वाहने, दुचाकी वाहने किंवा पादचारीही जाणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली.
आमगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातून आलेल्या मतदारांना तसेच गोंदिया विधानसभा क्षेत्रातील मतदारांना आणण्यासाठी गेलेले वाहन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पतंगा मैदानावर थांबविण्यात आले. तेथून मतदार पदयात्रा करीत सर्कस मैदानावर पोहचले. सोनियाजींच्या प्रचारसभेत आपली उपस्थिती राहावी यासाठी चार किमीची पदयात्रा करणे आमच्यासाठी मोठे नाही, असे खमारीचे मतदार मोहन तावाडे म्हणाले. सायंकाळच्या सभेसाठी आपण सकाळी ११ वाजतापासून घरून निघालो. दुपारी गोंदियात पोहोचल्यावर चार किमी पायी चालत आलो. सभास्थळी समोरची जागा मिळावी हा आपला प्रयत्न होता, असे रिसामाचे अजय बघाडे म्हणाले.
गोरेगाव, अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी तालुक्यातून येणाऱ्या वाहनांना कारंजा पोलीस मुख्यालयाच्या बाजुला, तिरोडाकडून येणाऱ्या वाहनांना कुडवा येथे तर बालाघाटकडून येणाऱ्या वाहनांना नागरा येथे थांबविण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने चहूबाजूंनी रस्ते बंद करण्यात आले होते. सभास्थळावर सभेच्या दोन तासापूर्वीपासून मतदारांनी गर्दी केली होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: A four km walk to meet Soniaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.