नोकरीच्या नावाखाली साडेतीन लाखांनी फसवणूक
By Admin | Updated: November 12, 2014 22:45 IST2014-11-12T22:45:54+5:302014-11-12T22:45:54+5:30
बँक आॅफ इंडियामध्ये परिचर म्हणून नोकरी देण्याच्या नावावर साडेतीन लाखांनी फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील रेल्वे अधिकारी अमर पंधरे याच्याविरोधात देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नोकरीच्या नावाखाली साडेतीन लाखांनी फसवणूक
देवरी : बँक आॅफ इंडियामध्ये परिचर म्हणून नोकरी देण्याच्या नावावर साडेतीन लाखांनी फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील रेल्वे अधिकारी अमर पंधरे याच्याविरोधात देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार मिलिंद नरेश साखरे, रा.तुकुमनगर (मोरगाव/ अर्जुनी) यांना मुंबई येथील रेल्वे विभागात उच्चपदावर कार्यरत असलेले अमर शालीकराम पंधरे रा. मकरधोकडा, ता.देवरी यांनी बँक आॅफ इंडियात परिचरपदावर नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यातून साखरे यांच्याकडून जुलै २०१४ मध्ये साडेतीन लाख रुपये घेतले. परंतु साखरे यांना नोकरी मिळाली नाही. त्यांना आपली फसवणुक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी अमर कुंभरेला पैसे परत मागण्याकरिता वारंवार दुरध्वनीवरुन संपर्क केला. परंतु त्यांनी पैसे परत केले नाही.
साखरे यांनी ५० हजार रूपये व्याजाने घेतले होते. ५० हजार रूपये शेतीवर कर्ज घेतले. आपल्या भावाकडून एक लाख रूपये उसनवारीवर घेतले होते. आईचे दागिने विकून ९७ हजार गोळा केले होते. ते पैसे अमर पंधरे याच्या बँक आॅफ इंडियाच्या खात्यात ९४ हजार, २० मार्च ला ६ हजार, ६ एप्रिलला एक लाख २५ हजार, ६ मे ला ३५ हजार व ३ मे ला देवरीच्या राधीका हॉटेलात एक लाख ४० हजार रूपये रोख दिल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे.
मिलिंद साखरे यांनी ११ नोव्हेंबरला अमर पंधरे व त्याचे सहकारी रंजन टेंभुर्णीकर रा. परसटोला यांच्याविरोधात देवरी पोलीसात तक्रार केली. देवरी पोलिसांनी अमर पंधरे व रंजन टेंभुर्णीकर यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७३, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार औटी व त्यांचे सहकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)