पर्यावरणपूरक उत्सवासाठी फाऊंडेशनची धडपड

By Admin | Updated: September 18, 2015 01:32 IST2015-09-18T01:32:52+5:302015-09-18T01:32:52+5:30

मांगल्याच्या देवतेचा १० दिवसांचा सण पर्यावरणाला हानी न पोहचविता साजरा करावा यासाठी मध्यभरतात पर्यावरण व वन्यजीव संरक्षणतसेच संवर्धनासाठी ....

The foundation's struggle for the eco-friendly festival | पर्यावरणपूरक उत्सवासाठी फाऊंडेशनची धडपड

पर्यावरणपूरक उत्सवासाठी फाऊंडेशनची धडपड

गोंदिया : मांगल्याच्या देवतेचा १० दिवसांचा सण पर्यावरणाला हानी न पोहचविता साजरा करावा यासाठी मध्यभरतात पर्यावरण व वन्यजीव संरक्षणतसेच संवर्धनासाठी अग्रणी असलेल्या सातपुडा फाऊंडेशनच्या वतीने धडपड सुरू आहे. यासाठी फाऊंडेशनच्यावतीने ग्रामीण भागात जनजागृतीचे काम सुरू असून शाळेतील विद्यार्थ्यांना मातीचे गणपती व निर्माल्यातून खत तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
गणपती उत्सवाला गुरूवारपासून (दि.१७) सर्वत्र थाटात सुरूवात झाली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील उत्सवाची परंपरा काही औरच आहे. एकाहून एक देखावे व मुर्त्यांची स्थापना येथे केली जात असल्याने गोंदियातील उत्सव लगतच्या राज्यांपर्यंत आपली ख्याती निर्माण करून आहे. मात्र उत्सवाच्या या थाटामाटात मानवाच्या हातून काही घोडचुकाही घडत आहेत. पर्यावरणाला विसरून सध्या उत्सव साजरा केला जात आहे. परिणामी १० दिवसांच्या या उत्सवानंतर नदी,नाल व तलाव निर्माल्य व विसर्जन करण्यात आलेल्या मुर्त्यांनी भरलेले दिसतात.
या प्रकारावर आळा बसावा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा यासाठी फाऊंडेशनने जनजागृती सुरू केली आहे. फाऊंडेशनचे प्रशिक्षक व संवर्धन अधिकारी मुकुंद धुर्वे ग्रामीण भागातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राला लागून असलेल्या गावांत हा उपक्रम राबवित आहेत. यात ते या परिसरातील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मातीचे गणपती अगदी सोप्या पद्धतीने तयार करण्याचे तसेच १० दिवसांत निघालेल्या निर्माल्यापासून खते तयार करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे व संचालक गिरी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला ग्रामीण भागात प्रतिसादही मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)
स्वत: तयार केलेल्या मूर्तींची स्थापना
धुर्वे यांनी जीईएस हायस्कूल कुऱ्हाडी, आदिलोक विद्यालय हायस्कूल बोळूंदा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळ बागडबन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगेझरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडेबर्रा, जीईएस हायस्कूल कवलेवाडा आदी शाळांमध्ये मातीची मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण शिक्षक व विद्यार्थ्यांना दिले. याचे फलित असे की, सर्वांनी आपल्या घरी स्वत: मातीची मूर्र्ती तयार करून व तिला नैसर्गिक रंगांनीच रंग देऊन स्थापना केली आहे.
एक गाव- एक गणपतीची सुरूवात
सातपुडा फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या जनजागृती उपक्रमापासून प्रेरीत होत मंगेझरी, बोळूंदा, कोडेबर्रा, बागळबन या गावांत एक गाव- एक गणपती ला सुरूवात करण्यात आली आहे. शासनाकडून एक गाव एक-एक गणपती ही मोहिम राबविली जाते. अशात फाऊंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या या मोहिमेला हातभार लावला जात आहे. गावात शांतता पूर्वक गणपती उत्सव साजरा व्हावा हा या मागचा हेतू असतो.

Web Title: The foundation's struggle for the eco-friendly festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.