कपिल केकत
गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने आता तृतीयपंथीयांना स्वतंत्र लिंग ओळख निवडीचे स्वातंत्र्य दिले असून याचा राज्यातील तृतीयपंथीयांना लाभ होणार असतानाच जिल्ह्यात नोंद असलेल्या ३ तृतीयपंथीयांचेही या निर्णयानंतर नशिब फळफळले असेच म्हणावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निर्णयानंतर आता मतदान यादीतही तृतीयपंथीयांची नोंद वाढणार यात शंका नाही.
तृतीयपंथी म्हटल्यास आजही समाजात त्यांना हीन दृष्टीने बघितले जात असून लोकशाही असून सुद्धा त्यांना पाहिजे तसे स्वातंत्र्य अद्याप मिळालेले नाही. परिणामी आजही तृतीयपंथीयांना हा एक शाप वाटत असून ते समाजापासून अलिप्त राहतात. मात्र राज्यघटना जात, धर्म, शिक्षण, लिंग या बाबींवर नागरिकांमध्ये भेदभाव करता येत नाही यावर भर देते. तिथे निसर्गाने व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणीत केलेला भेदभाव हा एखाद्या अशा व्यक्तीला त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे मत न्यायालयाने मांडले असून तृतीयपंथीयास निवडणूक प्रक्रियेत लिंग ओळखीचे स्वातंत्र्य देऊन सहभागी केले जावे असे सुचविले आहे. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने तृतीय पंथीयांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लिंग ओळख दिली असून यानंतर आता तृतीयपंथीयांना निवडणुकीच्या फडातही उतरण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला आहे. या निर्णयाचा राज्यातील तृतीयपंथीयांना लाभ मिळणार असतानाच जिल्ह्यात नोंद असलेल्या तीन तृतीयपंथीयांसाठीही हा निर्णय अतिमहत्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, सध्या तृतीयपंथीयांची नोंद एका वेगळ्या रकान्यात केली जात असतानाच यापुढे मात्र त्यांना लिंग निवडता येणार आहे.
-----------------------------------
निवडणुकीत उतरण्याचा मार्ग मोकळा
तृतीयपंथीयांना अन्य व्यक्तींप्रमाणे सर्व अधिकार असतानाच आता या निर्णयानंतर निवडणुकीत लिंग निवडून उतरता येणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला घेऊन उच्च न्यायालयाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत एका तृतीयपंथीयाने आपले नशिब अजमावले होते. आता या निर्णयानंतर तृतीयपंथी आपल्या लिंग निवडीच्या स्वातत्र्यांचा उपयोग करून निवडणुकीच्या फडात उतरू शकतील.
-----------------------------
निर्णयानंतर नोंदणी वाढण्याची शक्यता
तृतीयपंथीयांना आजही खालच्या नजरेने बघितले जात असल्याने कित्येक तृतीयपंथीयांकडृून मतदान यादीत नाव नोंदणी करवून घेतली जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आजघडीला अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त दोन तर तिरोडा तालुक्यात फक्त एक अशा एकूण तीन तृतीयपंथीयांची नोंद आहे. त्यात आता लिंग निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यास मतदान यादीत नोंद करण्यासाठीची संख्या वाढणार यात शंका नाही.