गावाच्या शेजारीच बांधले जंगलातील वनतळे
By Admin | Updated: December 27, 2014 02:05 IST2014-12-27T02:05:10+5:302014-12-27T02:05:10+5:30
वन विभागाने जंगलात बांधायचे वनतळे गावाच्या शेजारीच बांधल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गावाच्या शेजारीच बांधले जंगलातील वनतळे
सुखदेव कोरे सौंदड (रेल्वे)
वन विभागाने जंगलात बांधायचे वनतळे गावाच्या शेजारीच बांधल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हजेरी पट क्र. ११०१६२ व ११०१६३ या दोन्ही हजेरीपटनुसार जे मजूर कामावर आलेच नाही त्यांचेही नाव दाखवून व कामाचे दिवस वाढवून संबंधित मजुरांकडून रक्कम लुबाडल्याचा प्रकार घडला आहे.
या हजेरीपटावरील मजुरामध्ये दामोदर मोतीराम बोपचे, माया दामोदर बोपचे, शामु मोतीलाल बोपचे, जगदीश कान्हू रामटेके यांची नावे आहेत. दामोदर मोतीराम बोपचे रेेंगेपार यांची १८ एकर शेती आहे.शेतीत विहीर व पाण्याचापंप आहे. तसेच शाहू मोतीलाल हा इसम दिल्ली येथे कामाला असून यांचेही नाव हजेरीपटावर आहे. ग्रा.पं. रेंगेपारचे रोजगार सेवक जगदिश कान्हू रामटेके यांचेही नाव हजेरीपटावर आहे. पांढरी वगळता इतर बँकामधून त्यांना मजुरीचे बिल देण्यात आले आहे. रामदास मंसाराम मुनीश्वर हे शेळ्या चारण्याचे काम करतात, त्याचेही नाव हजेरीपटावर आहे. या सर्व बांधकामावर फक्त एक हजेरीपट पांढरी बँकेचा आहे. या हजेरीपटावर रेंगेपार व पांढरी येथील मजुरांची नावे आहेत.
प्रतिनिधीने मालीजुंगा येथे जाऊन वनतळ्याच्या कामाबाबत गावातील नागरिकांशी विचारपूस केली असता १० ते १२ मजूर रपट्याच्या कामाकरिता कामावर लावले होते. हे काम सिमेंट क्रॉकीटचे होते. बाकी सर्व मातीकाम कंत्राटदाराने जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून घेतले. जे लोक कामावर गेलेच नाही. त्यांचे नाव मजुरांच्या हजेरीपटावर टाकल्याचा आरोप ग्रामवासीयांनी केला आहे.
या योजनेनचे वैशिष्ट्ये म्हणजे मागेल त्याला काम असा रोहयो योजनेचा घोषवाक्य आहे.परंतु हे घोषवाक्य बाजूला सारून स्थानिक मजुरांना कामच मिळाले नाही. या वनतळींचे काम गोंदिया उपवनसंरक्षक कार्यालयामार्फत वनपरिक्षेत्राधिकारी सडक/अर्जुनीच्या माध्यमाने कंत्राटदारामार्फत वनमजुरांच्या देखरेखीत करण्यात आले.
गोंदिया जिल्हाच्या विकासासाठी केंद्र शासनातर्फे डावी-कडवी विचारसरणी योजनेंतर्गत दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाला २४ कोटी रुपयाचा निधी दिला जातो. या निधीचे वाटप नियोजन विभागामार्फत सबंधीत विभागाला करण्यात येतो. या अंतर्गत सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रात डावी-कडवी विचारसरणी योजना राबविण्यात येते. या योजनेचे काम रोहयो योजनेंतर्गत करण्यात येते.
ही वनतळी सोयीनुसार व जागेवर उपलब्ध साधनांचा वापर करून बनविण्यात आले. बनविण्यात आलेली सर्व वनतळी अधिकारी व कंत्राटदार यांच्या संयुक्त संमतीने व शासकीय निधीची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी जैसे सर्व नैसर्गिक सोयी उपलब्ध आहेत, जसे बोल्डर, गिट्टी, रेती, पाणी व माती आहे. अशाच ठिकाणी व गावालगत अधिकाधिक वनतलाव बांधण्यात आले आहेत.
सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रात एकूण २२ वनतळी व स्टोेरेंग बंधारे बांधण्यात आली आहेत. हे सर्व बंधारे गावालगत बांधण्यात आले आहेत. वास्तविक हे बंधारे वन्यप्राण्याचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी दाट जंगलात पाहिजे होते. जेणेकरून उन्हाळ्यात पशुपक्षी व वन्यप्राण्याना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होईल. बांधलेल्या वनतलावात बुंदभरही पाणी शिल्लक राहत नाही.