वन कर्मचाऱ्यांची वृद्धाला मारहाण
By Admin | Updated: September 14, 2015 01:34 IST2015-09-14T01:34:55+5:302015-09-14T01:34:55+5:30
जंगलात गुरे चारायला नेले या कारणावरून वनकर्मचाऱ्यांनी अरततोंडी/दाभना येथील एका वृद्ध इसमाला जबर मारहाण केली.

वन कर्मचाऱ्यांची वृद्धाला मारहाण
अर्जुनी मोरगाव : जंगलात गुरे चारायला नेले या कारणावरून वनकर्मचाऱ्यांनी अरततोंडी/दाभना येथील एका वृद्ध इसमाला जबर मारहाण केली. ही घटना स्थानिक बांबू आगार येथे घडली. वृद्धाच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी दोन वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार अरततोंडी/दाभना येथील गुलाब लक्ष्मण खोटेले (७०) हा इसम आपल्या घरातील गुरे जंगलात चराईसाठी घेऊन गेला होता. वनक्षेत्र सहायक काशीराम उकाजी मानकर यांनी त्याला बोलावले. ही जागा गुरे चराईसाठी आहे का, असे म्हणून त्या वृद्ध इसमाला काठी व थापड-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. याचवेळी वनरक्षक सुरेश रघुनाथ बडोले यांनी त्याला बोलावले व मारहाण केली. यात गुलाबला जबर दुखापत झाली.
मार असह्य झाल्याने गावातील काही इसमांना घडलेला प्रकार कथन केला. शुक्रवारी (११) गावातील काही इसमांना घेऊन गुलाब वन कार्यालयात गेला. त्याने आपबीती वनक्षेत्राधिकारी रहांगडाले यांना सांगितली. शेवटी याची पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदविण्यात आली. तोंडी तक्रार व वैद्यकीय अभिप्रायावरून पोलीसांनी काशीराम उकाजी मानकर (४७) वनक्षेत्र सहायक व सुरेश रघुनाघ बडोले (४७) यांचेविरूद्ध भादंविची कलम ३२४,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. वृद्धाच्या गुप्तांगावर दुखापत असून त्याला सिटी स्कॅन करण्यासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)