माकडांच्या उपद्रवाकडे वन विभागाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: November 26, 2014 23:08 IST2014-11-26T23:08:29+5:302014-11-26T23:08:29+5:30
तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथे मागील दोन महिन्यांपासून माकडांचा उपद्रव सुरू असून त्यांनी नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

माकडांच्या उपद्रवाकडे वन विभागाचे दुर्लक्ष
सुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथे मागील दोन महिन्यांपासून माकडांचा उपद्रव सुरू असून त्यांनी नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
डोंगरगाव (खडकी) ही दोन्ही गावे एकमेकांना जोडून असल्यामुळे या गावांचे कोणते घर कोणत्या गावात येते, हे लक्षात येत नाही. माकडे डोंगरगाव (खडकी) येथे मागील दोन महिन्यांपासून गावामध्ये शिरून घरावरील कवेलू, भाजीपाला, शेतातील पीक यांची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.
गावातील सर्वच महिला व पुरूष धान कापनी, भारे बांधणे, धानाची मळणी आदी कामांवर जातात. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत माकडे गावात शिरून घरामागील वाड्यांत पेरलेले वांगे, भेंडी, पेरू, शेंगा, लवकी, भोपळा यासारखे भाजीपाल्याचे पीक खाऊन नासधूस करीत आहेत. एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारून कवेलू मोठ्या प्रमाणात फोडतात. त्यामुळे नागरिकांची वित्तहानी होत आहे. गावात माकडांना भाजीपाला खाण्यास भरपूर प्रमाणात मिळतो. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या मोर्चा गावातून जात नाही. जर एखाद्या महिलेने माकडांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते तिच्या चवताळून तिच्या अंगावर धावून येतात. त्यामुळे महिला व लहान मुलामुलींच्या जीवालासुध्दा धोका आहे.
या माकडांनी डोंगरगाव (खडकी) येथील गावकऱ्यांना त्रस्त करून सोडले आहे. घरांची तर मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे.
याकडे वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले आहे. संबंधित विभागाने माकडांपासून झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी डोंगरगाव (खडकी) येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)