प्लास्टिक वापरावर बंदीचा फतवा
By Admin | Updated: May 4, 2015 01:47 IST2015-05-04T01:47:40+5:302015-05-04T01:47:40+5:30
केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियमांतर्गत पालिकेने शहरात प्लास्टिक वापरावर १ मे पासून बंदी घातली आहे.

प्लास्टिक वापरावर बंदीचा फतवा
गोंदिया : केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियमांतर्गत पालिकेने शहरात प्लास्टिक वापरावर १ मे पासून बंदी घातली आहे. यात ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या व खर्रा पन्नी सारख्या वस्तूंचा समावेश आहे. यासाठी पालिकेने प्लास्टीक वापरावरील बंदीचा तसा फतवाच काढला असून अन्यथा प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिक व व्यवसायीकांना दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत.
दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा वापर वाढतच चालला आहे. प्लास्टिकचा हा वापर मानवासह जनावरांसाठीही धोकादायक ठरत आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे वातावरणावर याचा परिणाम जाणवत असतानाच त्याचे अन्य दुष्परिणाही पुढे येत आहे. खाद्य पदार्थांसह प्लास्टिक खाल्याने जनावरांना आपल्या जीवास मुकावे लागत असल्याचे प्रकारही पुढे येत आहेत.
प्लास्टिक सडत व गळत नसल्याने वर्षानुवर्षे तसेच पडून राहते. विशेष म्हणजे यात प्लास्टिक पिशव्या व खर्रा पन्नी वापर झाल्यानंतर उघड्यावर फेकून दिले जाते. पुढे त्या नालीत पडतात व तशाच साचत जाऊन नाल्या चोक करतात. एकंदर प्लास्टिकचा वापरच डोकेदुखी व तेवढाच धोकादायक ठरत आहे. यावर आळा बसावा या दृष्टीने पालिकेने केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०११ अंतर्गत शहरात प्लास्टिक वापरावर बंदी लावली आहे.
यात पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक कोणत्याही स्वरूपात तसेच, खर्रा पन्नी नगर परिषद क्षेत्रात वापरण्यावर १ मे पासून प्रतिबंध लावला आहे. तर यापुढे व्यावसायिकांनी खर्रा पन्नी व ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा समजून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा फतवाच काढला आहे. (शहर प्रतिनिधी)