महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांशी सावत्र व्यवहार
By Admin | Updated: December 28, 2016 02:36 IST2016-12-28T02:36:32+5:302016-12-28T02:36:32+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनमध्ये मोडणाऱ्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर

महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांशी सावत्र व्यवहार
रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा : डेली रेल्वे मुव्हर्स देणार निवेदन
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनमध्ये मोडणाऱ्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील काही भाग येथील रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत सावत्र व्यवहार केला जात आहे. छत्तीसगडच्या गेवरा रोड, कोरबा, रायगड, बिलासपूर, रायपूर, दुर्ग या स्थानकांना प्रवासी गाड्या सोडण्यासाठी उपयुक्त बनविले जात आहे. तर चांदाफोर्ट, इतवारी, भंडारा रोड, तिरोडा, गोंदिया या स्थानकांची उपेक्षा करण्यात आली, असा आरोप डेली रेल्वे मुव्हर्स असोसिएशनने केला आहे.
बिहार, यूपीवरून येणाऱ्या अनेक गाड्या गोंदियापर्यंत विस्तारित करण्यात आल्या नाहीत. बिलासपूर, दुर्गवरून अनेक महत्वपूर्ण ४० गाड्या, गेवरारोड, रायगड, रायपूर, कोरबावरून अनेक प्रवासी गाड्या सुरू होतात. परंतु चांदाफोर्ट, इतवारी, गोंदिया स्थानकातून केवळ पॅसेंजर गाड्या सुटतात. गोंदियावरून सुटणाऱ्या विदर्भ व महाराष्ट्र एक्सप्रेस दुसऱ्या झोनच्या गाड्या आहेत. रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांचा गोंदिया दौरा २९ डिसेंबरला होणार असून सदर समस्यांचे निवेदन ड्रामचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव अशोक शर्मा, जितेंद्र परमार, रेल्वे कमिटी सदस्य मेहबूब हिरानी, प्रकाश तिडके, राजेश बन्सोड त्यांना देणार आहेत. स्थानकाच्या प्रत्येक फलाटावर टॉयलेटची समस्या असून ही समस्या सोडविण्यात यावी. उत्तरी व दक्षिण भागातील स्कूटर-कार पार्किंग कंत्राटावर द्यावे. त्यांच्या जागेचे सीमांकन दर्शविण्यात यावे. रेटबोर्ड मोठ्या अक्षरात दर्शनिय भागात लावावे. रेल्वे क्षेत्रातील स्थायी व अस्थायी अतिक्रमण हटविण्यात यावे. स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर किरकोळ विक्रेत प्रवाशांना रस्ता थांबवितात, ते हटविण्यात यावे. तिकीट घरासमोरील लोखंडी कटघरे हटविण्यात यावे. मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्सला उपयोगात आणण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. होमप्लॅटफॉर्मवरून महाराष्ट्र व विदर्भ एक्सप्रेस सुरू करावे, टीटी-पुरी गाडीचा थांबा द्यावा या मागण्या आहेत.
लाखों रूपयांचा अवैध दंड वसूल
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागात प्रवाशांकडून लाखो रूपयांचा दंड वसूल केला जातो. हा अभियान गोंदिया स्थानकाच्या जवळपास राबविला जातो. बक्षीस मिळविण्यासाठी रेल्वे स्टॉफ संघटीत होवून वसुली करतात. लगेज स्वरूपात सामान्य तिकीट धारक स्लीपर कोचमध्ये बसल्यास वसुली केली जाते. जनरल बोगीत प्रवाशांना फोटो आयटी कार्ड विचारून अवैध वसुली केली जाते. दपूम व दपू रेल्वेच्या प्रवासी गाड्यांमध्ये अनारक्षित बोगींची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे तिकीटधारकांनाही जागा मिळत नाही. त्यामुळे ते स्लीपर बोगीत बसून विनातिकीट प्रवासी बनतात. त्यांच्याकडूनही दंड वसूल केले जाते. नागपूर ते रायपूर दरम्यान स्लीपर व एसी कोचमध्ये लाखो रूपये अवैधपणे रेल्वे स्टॉफद्वारे दररोज वसूल केले जातात व स्वत:च्या खिशात घालतात.