पुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७०५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 22:34 IST2020-09-24T22:33:12+5:302020-09-24T22:34:56+5:30
२६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला होता. या नुकसानीचे कृषीे आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

पुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७०५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला होता. या नुकसानीचे कृषीे आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात ७०५९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल या दोन्ही विभागाने शासनाकडे पाठविला होता.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून त्याचा धानपिकांना मोठया प्रमाणात फटका बसला होता. तसेच घरांची सुध्दा पडझड झाली होती. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. केंद्राच्या चमूने सुध्दा जिल्ह्याचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली होती. अतिवृष्टी आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना पुराचा फटका बसला. जवळपास ३ दिवस धानपिक पाण्याखाली राहिल्याने संपूर्ण धान सडले. तर काही शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेली. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मते १५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. पण कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ७०५९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याचा अहवाल सुध्दा शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने नुकसान भरपाईपोटी ८ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नुकसान भरपाईसाठी १३ हजार ५६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. नुकसान भरपाईचा निधी सुध्दा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याचे वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे.
नुकसानीच्या तुलनेत मदत अल्पच
पुरामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरवरील धान पिकाचे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेल्याने त्यांना पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले. पण त्यातुलनेत शासनाने मंजूर केलेली नुकसान भरपाईची रक्कम फारच कमीे असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.