ठरावीक वेळापत्रकातील बसफेऱ्या केल्या जातात रद्द

By Admin | Updated: November 19, 2014 22:50 IST2014-11-19T22:50:42+5:302014-11-19T22:50:42+5:30

गोंदियाच्या मुख्य बस स्थानकातून सकाळ ते सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी वेळापत्रकानुसार देवरी, चिचगड व ककोडीसाठी बसेस आहेत. परंतु कधी वाहक नाही, कधी चालक नाही तर कधी बस उपलब्ध नाही,

Fixed schedules are canceled | ठरावीक वेळापत्रकातील बसफेऱ्या केल्या जातात रद्द

ठरावीक वेळापत्रकातील बसफेऱ्या केल्या जातात रद्द

देवरी : गोंदियाच्या मुख्य बस स्थानकातून सकाळ ते सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी वेळापत्रकानुसार देवरी, चिचगड व ककोडीसाठी बसेस आहेत. परंतु कधी वाहक नाही, कधी चालक नाही तर कधी बस उपलब्ध नाही, असे सांगून यापैकी अनेक बसफेऱ्या रद्द केल्या जातात. त्यामुळे देवरी, चिचगड व ककोडीकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठीच गैरसोय होत आहे. यासाठी आगार व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
या मार्गावर अनेकदा बसेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन ते तीन तास विलंबाने सुटतात. तसेच अनेकदा दोन ते तीन बसेस एकापाठोपाठ एक सुटत असल्याचे चित्र बघायला मिळते. अशावेळी त्या बसेस रिकाम्याच धावत असल्याचेसुध्दा दिसून येते. याप्रकारामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होते. शिवाय एसटी महामंडळाचेसुध्दा नुकसान होते. याकडे एसटी महामंडळाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. याबाबत अनेकदा आगार व्यवस्थापक व भंडाऱ्याचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे प्रवाशांनी व लोकप्रतिनिधींनी लिखीत तक्रारी दिल्या आहे. परंतु वेळापत्रकानुसार बसेसच्या संचालनात कसलीही सुधारणा करण्यात आली नाही. यावरून अधिकाऱ्यांना मनमर्जीने काम करण्याची खुली सुट देण्यात आली तर नाही, असा संशय निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
देवरी तालुका आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त तालुका आहे. शासनाव्दारे आदिवासींच्या उन्नती व प्रगतीसाठी विविध योजना करोडो रुपये खर्च करून राबविल्या जात आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळ कुंभकर्णी निद्रेत असल्याने आदिवासी भागातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोंदिया आगार व्यवस्थापकांव्दारे १६, १७, व १८ नोव्हेंबर रोजी एक अतिरीक्त बस सकाळी ६.३० वाजता गोंदियावरून देवरीसाठी सोडण्यात येत असल्याची चर्चा आहे. परंतु आता गर्दीचे कसलेही सिजन नसताना सदर बसेस का सोडल्या जातात, अशा प्रश्न देवरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वेळापत्रानुसार बसेस चालविल्या जात नाही. त्याबाबत चौकशी केली तर बहानेबाजी करून टालमटोल केला जातो. असे असतानाही मग एक अतिरीक्त बस सोडण्यामागे काय कारण आहे, याविषयी चर्चा होत आहे. नवीन आमदार संजय पुराम यांनी या समस्येकडे लक्ष देऊन प्रवाश्यांचे सोईसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी देवरी तालुकावासीयांनी केली आहे.

Web Title: Fixed schedules are canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.