पाच गावे रात्रभर अंधारात
By Admin | Updated: May 15, 2015 00:52 IST2015-05-15T00:52:08+5:302015-05-15T00:52:08+5:30
बुधवार सायंकाळी ६ वाजतापासून अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तिरोडा तालुक्यातील पाच गावांमधील वीज पुरवठा

पाच गावे रात्रभर अंधारात
गोंदिया : बुधवार सायंकाळी ६ वाजतापासून अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तिरोडा तालुक्यातील पाच गावांमधील वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण रात्र नागरिकांना उष्णतेच्या त्रासात, डासांच्या प्रकोपात व अंधारात काढावी लागली. दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी वीज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांना नळाच्या पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागले.
बुधवारी सांयकाळी थोड्या प्रमाणात पाऊस व वारा आला. त्यामुळे सुरूवातीला तिरोडा तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. एवढेच नव्हे तर तिरोडा शहारातीलही वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र तिरोडा शहरातील वीज पुरवठा अवघ्या एका तासाच्या आतच पूर्ववत झाला. अनेक गावांतीलसुद्धा वीज पुरवठा थोड्या कालावधीनंतर पूर्ववत सुरू झाला.
मात्र चिरेखनी, तिरोडा रेल्वे चौकी, बस स्थानक परिसर, लोधीटोला, भुराटोला आदी गावांत तब्बल १८ तासांपर्यंत वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे या गावांतील नागरिकांना रात्रभर अंधारात राहून डासांचा व उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागला.
अनेकांनी संपूर्ण रात्र जागूनच काढली. अंधारात इतर सरपटणारे जीवजंतू घरात किंवा परिसरात शिरण्याची शक्यता असते. त्याची भीतीसुद्धा नागरिकांच्या मनात होती. शिवाय गरम झालेल्या जमिनीतून सायंकाळी पाऊस आल्याने वाफ निघत असल्याने संपूर्ण रात्र उष्णतेत काढावी लागल्याचे नागरिक सांगतात.
दरम्यान रात्री अनेकांनी ग्रामीण विद्युत कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधून वीज पुरवठा कधी सुरू होणार, याची विचारणा केली. मात्र बिघाड दुरूस्तीचे काम सुरू आहे. अर्ध्या तासात वीज पुरवठा सुरू होईल, असे वीज कार्यालयातून सांगण्यात आले होते. परंतु एक तास, दोन तास असे करीत संपूर्ण रात्र लोटून गेली, मात्र विद्युत पुरवठा सुरू होवू शकला नाही. विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे पाच गावांतील हजारो नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागल्याची चर्चा तिरोडा तालुक्यातील गावागावांत आहे.
यानंतर काही गावांत दुसऱ्या दिवसी गुरूवारी दुपारी १२ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला होता. तर काही ठिकाणी दुपारी चार वाजतानंतरही वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेकांचे मोबाईलसुद्धा बॅटरी चार्जिंगअभावी ठप्प पडले होते. त्यामुळे संपर्क साधने बंद पडले होते. विद्युतवर चालणारी अनेक उपकरणे घराघरांत बंद होते.
या प्रकारामुळे नागरिकांनी विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. (प्रतिनिधी)