पाच जणांनी केले पोलिसांकडे हत्यारे जमा
By Admin | Updated: September 9, 2016 01:09 IST2016-09-09T01:09:48+5:302016-09-09T01:09:48+5:30
भामरागड तालुक्यातील संवेदनशील भाग असलेल्या नारगुंडा गावात पोलिसांच्या आवाहनानंतर नागरिकांनी एक गाव, एक गणपती

पाच जणांनी केले पोलिसांकडे हत्यारे जमा
नारगुंडात एक गाव, एक गणपती : नक्षल्यांना मदत न करण्याचा केला संकल्प
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील संवेदनशील भाग असलेल्या नारगुंडा गावात पोलिसांच्या आवाहनानंतर नागरिकांनी एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबवून पोलिसांकडे आपले पाच भरमार हत्यारही सुपूर्द केले व नक्षल्यांना मदत न करण्याचा व हत्यार न उचलण्याचा संकल्प गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी जाहीर केला. भामरागडसारख्या संवेदनशील भागात झालेली ही घटना निश्चितच मोठी नांदी म्हणावी लागेल.
गडचिरोलीपासून १८० किमी अंतरावर नारगुंडा गावात पूर्वी गावकरी व पोलीस वेगवेगळे गणपती बसवायचे. परंतु यावेळी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी संदीप मिश्रा, सीआरपीएफ ३७ बटालियनचे सहायक कमांडंट अनुपम सिंह यांनी पुढाकार घेऊन गावकरी व पोलिसांची बैठक घेतली व एक गाव, एक गणपती मांडण्याचा निर्णय घेतला. सर्व सहमतीने यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रभारी अधिकारी संदीप मिश्रा व सीआरपीएफचे सहायक कमांडंट अनुपम सिंह यांनी नागरिकांना नक्षलवाद्यांना मदत करू नका, आपल्याकडे हत्यार असेल तर ते जमा करून समाजाच्या मूळ प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन केले. लागलीच या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी नक्षलमुक्त गाव करण्याचा संकल्प करीत यापुढे शस्त्र न उचलण्याचा निश्चय जाहीर केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक रामासिंहासन, पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार चुक्कू विडपी आदी उपस्थित होते. यावेळी गावकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)