लग्नाच्या पाच दिवसाआधीच भावी वधू ठरली हुंडाबळी

By Admin | Updated: November 10, 2016 00:32 IST2016-11-10T00:32:47+5:302016-11-10T00:32:47+5:30

भावी संसाराचे स्वप्न रंगवून लग्नाच्या मुहूर्ताची वाट पाहणाऱ्या भावी वधूला भावी पतीकडून वारंवार हुंड्यासाठी टाकल्या जाणाऱ्या दबावाला कंटाळून

Five days before the wedding, Duryodhini became the future bride | लग्नाच्या पाच दिवसाआधीच भावी वधू ठरली हुंडाबळी

लग्नाच्या पाच दिवसाआधीच भावी वधू ठरली हुंडाबळी

गळफास घेऊन आत्महत्या : मोबाईल संभाषणातून हुंड्यासाठी दबाव
आमगाव : भावी संसाराचे स्वप्न रंगवून लग्नाच्या मुहूर्ताची वाट पाहणाऱ्या भावी वधूला भावी पतीकडून वारंवार हुंड्यासाठी टाकल्या जाणाऱ्या दबावाला कंटाळून अखेर त्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रिसामा येथील सोमवारच्या रात्री घडली.
संध्या लोकचंद बारई (२५) असे त्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. तिचे लग्न नागपूर येथील व्यवसायाने शिक्षक असलेल्या प्रदीप शंकरराव भोंगेकर (३२) यांच्याशी ठरले होते. विवाहासाठी १३ नोव्हेंबरला मुहूर्तही काढण्यात आला होता. सर्व तयारीही पूर्ण झाली होती.
दरम्यान भावी पती प्रदीपकडून संध्याच्या कुटुंबाकडे लग्नाच्या खर्चाची मागणी करण्यात आली. वऱ्हाड्यांसाठी बसेसचा खर्च, ए.सी., सोने व इतर साहित्याची मागणी केली होती. मात्र संध्याच्या कुटुंबियांनी प्रदीपच्या मागणीप्रमाणे बसेस, एसीची मागणी पूर्ण केली, तर सहा लोळे सोने व एक सोन्याचा गोफ देण्यासाठी तयार केली होती. यात मृतकांच्या कुटुंबियांनी मुलीच्या भावी जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तुंची खरेदी केली होती. लग्न मुहूर्तावर येत असल्याने आप्तजणांना लग्न पत्रिकाही वाटप करण्याचे कार्य जवळपास आटोपले होते. परंतु लग्नाच्या मुहूर्ताआधी मृतकाच्या कुटुंबाकडून अधिक हुंडा मिळावा यासाठी प्रदीप याचा दबावतंत्राचा वापर करीत होता.
७ नोव्हेंबरला रात्री १० वाजता प्रदीपने मोबाईलवरुन मृतक संध्याला हुंड्यासाठी प्रताडीत केले. यावरुन संध्या अधिकच विचलीत झाली. तिने घरी पहिल्या माळ्यावरील खोलीत छताता ओळणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
संध्याचे आई व वडील यावेळेस मुलगी भावी जावयासोबत बोलत असल्याचे दिसले. याच कालावधीत तिने विचलीत होऊन आत्महत्या केली असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. पोलिसांनी मर्ग दाखल करुन तपास गतीने चालविला आहे.(शहर प्रतिनिधी)

उच्चशिक्षित कुटुंबाची वाताहत
मृतक संध्या बारईचे कुटुंब उच्चशिक्षीत आहे. वडील लोकचंद मुख्याध्यापक असून दोन भाऊही डॉक्टर व इंजिनीअर आहेत. संध्या स्वत: फार्मसी, डीटीएड व डीएमएलटी केल्यानंतर पुढेही विविध अभ्यासक्रम करण्यासाठी इच्छूक होती. निरंतर शिक्षणातून नावलौकीक मिळविण्याचे स्वप्न बघणारी संध्या अशी हरपल्याने बारई कुटुंबाची वाताहात झाली.
मृतक संध्याने गळफास लावल्याची तक्रार दाखल झाली आहे. दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणात तत्काळ तपास करुन दोषीवर कारवाई होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

Web Title: Five days before the wedding, Duryodhini became the future bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.