दोन गटाच्या हाणामारीतील पाच आरोपींना अटक
By Admin | Updated: September 7, 2016 00:22 IST2016-09-07T00:22:33+5:302016-09-07T00:22:33+5:30
तालुक्यातील तेलनखेडी गटग्रामपंचायतच्या मुंढरीटोला या गावात पोळ्याचे तोरण बांधण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणीमारीतील

दोन गटाच्या हाणामारीतील पाच आरोपींना अटक
मुंढरीटोला येथील प्रकरण : तोरण बांधण्यावरून उद्भवलेला वाद
गोरेगाव : तालुक्यातील तेलनखेडी गटग्रामपंचायतच्या मुंढरीटोला या गावात पोळ्याचे तोरण बांधण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणीमारीतील पाच आरोपींना गोरेगाव पोलिसांनी अटक केली.
भैयालाल टेकाम (७०) यांना गावातीलच पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांनी प्रकरणाची दखल घेऊन पाचही आरोपींना अटक केली. पोलीस सुत्रानुसार, १ सप्टेंबर रोजी पोळ्याचे तोरण भैयालाल टेकाम यांनी बांधले असता आरोपी संतोष बाबूलाल तावाडे, बाबूलाल तावाडे, कमल तावाडे, शामराव वडगाये यांनी भैय्यालाल यांना जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी सळाखीने मारहाण केली. यावेळी त्यांनी तुला तोरण बांधण्याचा अधिकार नाही, कुणाला विचारून तोरण बांधले असे म्हणून भांडण करीत मारहाण केली.
यात टेकाम जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. पोलिसांनी पाचही आरोपींविरूध्द कलम १४३, ३२४, ३२३ भादंवि व सहकलम ३,१, (आर) (एस) अनु.जाती, जमाती सुधारीत अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
दुसरीकडे याच प्रकरणात भैय्यालाल टेकाम, रामलाल बघेले, रोषनलाल बघेले, विश्वनाथ इवनाते, महेश बघेले, श्रीराम येटरे, विजय बघेले यांनी आपल्या काकेभावासोबत भांडण करून मारहाण केली व कपडे फाडून धमकी दिली, अशी तक्रार संतोष बाबूलाल तावाडे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)