पहिल्याच पावसात पुल गेला वाहून
By Admin | Updated: July 8, 2016 01:49 IST2016-07-08T01:49:27+5:302016-07-08T01:49:27+5:30
तालुक्यातील अतीदुर्गम ककोडी क्षेत्रातील बुजरबडगा-हेरपार मार्गावर मग्रारोहयोअंतर्गत बनविल्या गेलेला २२ लाखांचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ...

पहिल्याच पावसात पुल गेला वाहून
कारवाईची मागणी : बुजरबडगा-हेरपार मार्गावरील घटना
देवरी : तालुक्यातील अतीदुर्गम ककोडी क्षेत्रातील बुजरबडगा-हेरपार मार्गावर मग्रारोहयोअंतर्गत बनविल्या गेलेला २२ लाखांचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने मग्रारोहयो विभागात एकच खळबळ उडाली आहे.
इस्तारी ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने नियमबाह्य पद्धतीने २२ लाख रुपयांच्या या पुलाचे निर्माण करण्यात आले. बुजरबडगा या गावाजवळ या पुलाचे बांधकाम २ महिन्यापूर्वी करण्यात आले. कंत्राटदार अशोक राऊत द्वारा नकृष्ट साहित्याचा वापर व एस्टीमेटनुसार कार्य न झाल्याने पूल वाहून गेला. गुरूवारी (दि.७) घटनास्थळाची पाहणी केली असता २८ मिटर लांबीच्या या पुलाच्या दोन्ही बाजूला २ ते ३ मिटर पूल पूर्णपणे वाहून गेला असून पुलावर भेगा पडलेल्या दिसून आल्या.
विशेष म्हणजे, कंत्राटदाराची माणसे आज पुलाला ढिगळ लावण्याचे काम करीत होते. एस्टीमेटनुसार सिमेंट व गिट्टीचा वापर न झाल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी लावला. पुलाच्या बांधकाम वेळेस नागरिकांनी आक्षेप घेवूनही कंत्राटदाराने स्वयंमर्जीने काम केले व म्हणूनच आज २२ लाख रुपयांचा पूल वाहून गेला आहे. हा पूल वाहून गेल्याने ऐन पावसाळ्यात बुजरबडगा, येडमागोंदी, कलकसाच्या लोकांना ककोडीला जाण्यास अडचण निर्माण होत आहे.
२२ लाख रुपये किमतीच्या २८ मिटर लांबीच्या एवढ्या मोठ्या पुलाला मग्रारोहयोद्वारे कसे काय करण्यात आले असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग्रारोहयोचे सहाय्यक अधिकारी गौतम साखरे यांना या पुलाबद्दल विचारले असता पुलाच्या बाजुची माती केवळ वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. तर याबाबत इस्तारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जी.डी. चारथळ यांनी पूल वाहून गेल्याची कबुली दिली. आता या २२ लाखाच्या पुल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी असलेल्या अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करुन पुलाचे बांधकाम करुन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागत आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार राऊत यांनी मग्रारोहयोत भ्रष्टाचार केल्याचे या अगोदर सुद्धा उघडकीस आले होते. परंतु मग्रारोहयोतील अधिकारी व पं.स.मधील पदाधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने कंत्राटदाराला दरवर्षी लाखोंची कामे दिली जात असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)