अभयारण्यात आगीचा धोका
By Admin | Updated: March 11, 2015 01:25 IST2015-03-11T01:25:52+5:302015-03-11T01:25:52+5:30
उन्हाळ्याचे दिवस आले म्हणजे जंगलाला आग लागणे नवीन बाब नाही. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान आता नवेगाव व्याघ्र प्रकल्प झाला आहे.

अभयारण्यात आगीचा धोका
सडक-अर्जुनी : उन्हाळ्याचे दिवस आले म्हणजे जंगलाला आग लागणे नवीन बाब नाही. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान आता नवेगाव व्याघ्र प्रकल्प झाला आहे. त्यामुळे शासनाच्या विविध अटी लादून राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात जाण्यास बंदी केली आहे. या वनांना आगीपासून वाचविण्यासाठी वन व वन्यजीव विभाग तत्पर आहे.
नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील कवलेवाडा, कालीमाटी व झलकारगोंदी या गावांतील लोकांचा राष्ट्रीय वनात हस्तक्षेप राहू नये, यासाठी गेल्या दोन वर्षापूर्वी सौंदड गावाजवळील श्रीरामनगर या गावी पुनर्वसन करण्यात आले. त्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले.
‘जंगळ राहील तर वाघ राहील व वाघ राहतील तर पर्यटक येतील’ या समिकरणानुसार राष्ट्रीय वनात मनुष्यांचा हस्तक्षेप कमी करण्याचा शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हा १२ हजार ९५५ हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे. त्यात कोसंबी, कोकणा, कोसमघाट, खोबा, ऐलोडी, रामपुरी आदी गावांचा परिसर उद्यानालगत येतो. तर नवेगाव अभयारण्य खोली, बोंडे व डोगरगाव-डेपो या वनपरिक्षेत्रात येतो. नवेगाव अभयारण्य हा १२ हजार २७६ हेक्टर आर क्षेत्रात विस्तारित आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याला आग लागू नये यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी नेहमी तत्पर असल्याचे दिसून येत आहे.कोसबी, कोसमघाट, कोकणा, ऐलोडी, रामपुरी या गावांत वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वनअधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. रामपुरी येथील जनजागरण मेळाव्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे वनपिरक्षेत्र अधिकारी रमेश दोनोडे यांनी वनाला आग कशी लागते व त्यावर नियंत्रण करण्यासाठी गाव परिसरातील नागरिकांनी व गठीत समित्यांनी सहकार्याची भावना ठेवून जंगलाला आग लागणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय वनाला लागणारी आग ९५ टक्के दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून लावली जाते. तर ५ टक्के आग ही फक्त बांबूच्या घर्षनामुळे लागत असल्याचे दिसून येते. जंगलाला वनवा लागल्याने जंगलातील मूल्यवान औषधी वनस्पती जळून नष्ट होतात. उन्हाळ्यात लागणारा वनवा हा फार भयावह असतो. धावत सुटल्यासारखा जोरात पेट घेतो. या वनव्यामुळे लहान जीवजंतू, प्राणी व पक्षांना जीव गमवावा लागतो. तर मोठे प्राणी हे जीव वाचविण्यााठी धावत सुटतात. यामुळे गाव परिसराकडे आलेल्या प्राण्यांनाही जीव गमवावा लागतो. काही प्राणी हे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत मरताना दिसतात. जंगलाला वनवा लागूच नये यासाठी प्रत्येक नागरिकांचे सहकार्याची भावना ठेवणे गरजेचे आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या गावातील लोक हे मोहफूल वेचण्यासाठी आग लावतात. त्या लोकांनी आग स्वत: विझविण्याची दक्षता घ्यावी. पण तसे होत नाही. बहुतेक लोक आग लावून मोकळे होतात. यामुळे जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)