नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात लघुशंका करणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:01 IST2018-09-18T13:56:06+5:302018-09-18T14:01:24+5:30
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरखमारा येथील राखीव वन्यजीव क्षेत्रात नियम डावलून, गाडीखाली उतरुन लघुशंका करणे नागपूर येथील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले.

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात लघुशंका करणे भोवले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरखमारा येथील राखीव वन्यजीव क्षेत्रात नियम डावलून, गाडीखाली उतरुन लघुशंका करणे नागपूर येथील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. वन्यजीव अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी वन्यजीव विभागाने सदर व्यक्तीवर एक हजार रुपये दंड ठोठावला.
ज्ञानेश्वर भरडे, रा.वकीलपेठ नागपूर असे या व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या चारचाकी वाहनाने नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरखमारा गेटने जंगल सफारी करण्यासाठी रविवारी (दि.१६) गेले होते. हा परिसर वन्यजीवांसाठी राखीव असल्याने वन्यजीव विभागाने नियम लागू केले आहते. परिसरात चारचाकी वाहनातून खाली उतरण्यास मनाई आहे. चोरखमारा गेटमधून प्रवेश केल्यानंतर भरडे यांनी या परिसरात वाहनातून उतरुन लघुशंका केली.
हा प्रकार तेथे उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एच.डिंगोळे यांच्या लक्षात येताच त्यांनी भरडे यांचे वाहन थांबवून त्यांच्यावर १ हजार रुपयांचा दंड आकारला. तसेच या परिसरात वाहनातून खाली उतरण्यास मनाई असल्याची बाब सुध्दा त्यांच्या लक्षात आणून दिली. डिंगोळे यांनी नवेगाव-नागझिरा टायगर रिजर्व कन्झर्वेशन फाऊंडेशनच्या नावाची १ हजार रुपयांच्या दंडाची पावती क्रमांक ३५२३ ही भरडे यांना दिली.
संरक्षित क्षेत्रात वन्यजीवांचा वावर असतो. त्यामुळे त्यांच्या जीवाला कुठलाही धोका पोहचू नये, यासाठी या परिसरात पर्यटकांसाठी काही नियम लागू केले आहे. भरडे यांनी या नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
- आर.एम.रामानुजन, क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा
व्याघ्र प्रकल्प