अखेर ‘त्या’ तीनही वीज अभियंत्यांचे निलंबन रद्द

By Admin | Updated: August 21, 2015 02:11 IST2015-08-21T02:11:37+5:302015-08-21T02:11:37+5:30

वीज वितरण कंपनीच्या तीन अभियंत्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचारी संयुक्त कृती समितीने बुधवारी (दि.१९) रामनगर कार्यालयात असहकार आंदोलन केले.

Finally, the suspension of the 'three' power engineers canceled | अखेर ‘त्या’ तीनही वीज अभियंत्यांचे निलंबन रद्द

अखेर ‘त्या’ तीनही वीज अभियंत्यांचे निलंबन रद्द

असहकार आंदोलन : ऊर्जामंत्र्यांनी घेतला धसका
गोंदिया : वीज वितरण कंपनीच्या तीन अभियंत्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचारी संयुक्त कृती समितीने बुधवारी (दि.१९) रामनगर कार्यालयात असहकार आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेत राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या अभियंत्यांच्या निलंबन आदेश रद्द केला. मात्र त्या वीज अभियंत्यांच्या कामाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
मंगळवारी उर्जामंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या येथील आढावा बैठकीत केटीएस रूग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मांडण्यात आली होती. याप्रकरणी उजार्मंत्र्यांनी अतिरीक्त कार्यकारी अभियंता सुहास धामनकर, सहायक अभियंता सुमित पांडे यांना निलंबीत करण्याचे आदेश दिले. तसेच उपकार्यकारी अभियंता नावेद शेख हे अपडाऊन करीत असून पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार काहींनी मांडली. त्यावर उर्जामंत्र्यांनी शेख यांनाही निलंबीत करण्याचे आदेश दिले होते.
मात्र वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू करताच या आंदोलनाचा धसका घेत उर्जामंत्र्यांनी तिन्ही अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश मागे घेतले. तसेच याबाबत इंजिनियर्स असोसिशएनचे सरचिटणीस सुनिल जगताप यांनी येथील पदाधिकाऱ्यांना निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती दिली व त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात कृती समितीचे हरीष डायरे, विवेक काकडे, सुनिल मोहुर्ले, दिगंबर कटरे, राजू गोंधरे, सचिन उके, सुनिल रेवतकर, सरोज परिहार, विजय चौधरी, एस.एस.फुंडे, अशोक ठवकर, गणेश चव्हाण, विश्वजीत मेंढे, रमेश महारवाड यांच्यासह मोठ्या संख्येत कर्मचारी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार
उर्जामंत्र्यांनी चौकशी न करता थेट तीन अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने हा मुद्दा वीज कर्मचारी कृती समितीच्या जिव्हारी लागला होता. यावर कृती समितीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी उर्जामंत्र्यांच्या आदेशाचा निषेध नोंदवित बुधवारी (दि.२०) तिन्ही अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश मागे घेण्यात यावे या मागणीसाठी असहकार आंदोलन केले. या आंदोलनांतर्गत कर्मचाऱ्यांनी अधिक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांच्या कक्षात धरणे आंदोलनही केले. तसेच निलंबन आदेश मागे न घेतल्यास गुरूवारपासून (दि.२१) तिन्ही अभियंत्यांचे कुटुंबिय आमरण उपोषण करणार व कर्मचारी कामबंद आंदोलनावर जाणार असल्याचा इशारा दिला होता. एवढेच नव्हे तर गोंदियातील आंदोलनाच्या धर्तीवर नागपूर परिमंडळ येथे सबॉर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनच्यावतीने मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांना घेराव घालण्यात आला होता.
निलंबनाची कारवाई झालीच नाही !
तिन्ही अभियंत्यांच्या निलंबनाच्या मुद्दयावर अधीक्षक अभियंता चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निलंबनाची कारवाई झालीच नसल्याचे सांगितले. तसेच केटीएस रूग्णालयातील प्रकरणाची चौकशी केली असता त्यात ८ आॅगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता रूग्णाचा मृत्यू झाला असून वीज पुरवठा सायंकाळी ८.२० वाजता सुरू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे रूग्णाचा मृत्यू वीज पुरवठा खंडीत झाल्याने झालेला नसल्याचे स्पष्ट झाल्याने धामनकर दोषी नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच पांडे सुद्धा यातून निर्दोष सिद्ध होत असल्याचे अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी सांगितले. तरिही धामनकर, पांडे व शेख यांच्या प्रकरणाची महावितरणकडून सखोल चौकशी केली जाईल व दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Finally, the suspension of the 'three' power engineers canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.