अखेर न.प. कर्मचारी पतसंस्था बरखास्त
By Admin | Updated: September 27, 2014 23:19 IST2014-09-27T23:19:02+5:302014-09-27T23:19:02+5:30
गोंदिया नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सात संचालकांना काही दिवसांपूर्वी सहायक उपनिबंधकांनी बर्खास्त केले होते. त्यामुळे पतसंस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आले होते.

अखेर न.प. कर्मचारी पतसंस्था बरखास्त
गोंदिया : गोंदिया नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सात संचालकांना काही दिवसांपूर्वी सहायक उपनिबंधकांनी बर्खास्त केले होते. त्यामुळे पतसंस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आले होते. शेवटी सहायक निबंधक (सहकारी संस्था) राजेंद्र वाघे यांनी ही पतसंस्था बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश २३ सप्टेंबरला जारी केला आहे.
आता या पतसंस्थेचा कार्यभार संभाळण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ष २००९ मध्ये नगर परिषद सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली होती. त्यात १६ संचालकांची निवड करण्यात आली होती.
ही पतसंस्था नगर परिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आहे. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कर्ज वाटून व्याजाची वसूली करीत होती. निवडण्यात आलेल्या १६ संचालकांपैकी सुशिला राठोड यांनी सुटी घेतल्याने त्यांचे संचालकपद रद्द करण्यात आले होते. पुरूषोत्तम गाडकिने यांची बदली झाल्याने त्यांना संचालक पदावरून दूर करण्यात आले. दिनेश तावाड़े यांचे निधन झाल्याने त्यांचे नाव संचालकपदावरून दूर झाले. याशिवाय तिलक दीप, अनुप बैरीसाल, अमित श्रीवास्तव यांनी कर्ज घेऊनही ती रक्कम परत न केल्याने त्यांना संचालकपदावरून बरखास्त करण्यात आले होते.तसेच माया माटे, राजू शेंद्रे, शिवनाथ मालाधरी, मदन बघेले यांना अग्रीम रक्कम परत न केल्याच्या कारणातून संचालकपद गमवावे लागले होते. विशेष म्हणजे अजयसिंह गौर हे पतसंस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी एक प्रमाणपत्र सादर केले होते. हे प्रकरण समोर आल्याने त्यांनाही संचालकपद गमवावे लागले. प्रमोद सोनवाने, संजय रहांगडाले, उमाशंकर शर्मा यांनीही आपल्या पदांचा राजीनामा २२ सप्टेंबरला दिला. संचालक मंडळ अल्पमतात असल्याने त्यामुळे संस्थेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालविणे कठीण असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे छेदीलाल इमलाह आणि राजेंद्र लिल्हारे यांचेही संचालकपद रद्द करून सहायक निबंधकांनी यू.एस. हलमारे यांची अधिकारी म्हणून नियुक्ती केली. (तालुका प्रतिनिधी)