अखेर बेपत्ता नितीनचा मृतदेहच विहीरीत सापडला
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:05+5:302016-04-03T03:51:05+5:30
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजतापासून घरुन खेळता-खेळता अचानक बेपत्ता झालेल्या ३ वर्षीय नितीन विलास पुस्तोडे या निरागस बालकाचा मृतदेह ...

अखेर बेपत्ता नितीनचा मृतदेहच विहीरीत सापडला
बोंडगावदेवी : शुक्रवारी सकाळी १०.३० वाजतापासून घरुन खेळता-खेळता अचानक बेपत्ता झालेल्या ३ वर्षीय नितीन विलास पुस्तोडे या निरागस बालकाचा मृतदेह शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान गंगाजमुना मातेच्या देवस्थान परिसरातील विहीरीमध्ये दिसून आला.
मंदिरालगत राहत असलेल्या विलास श्रीराम पुस्तोडे यांचा मुलगा नितीन (वय ३ वर्ष, २ महिने) हा शुक्रवारी (दि.१) सकाळी १० वाजतदरम्यान जवळच्या मंदिर परिसरात खेळायला गेला होता. सकाळच्या जमुना मातेच्या आरतीला सुध्दा नितीन मंदिरात हजर होता असे बोलल्या जाते.
नितीनचे वडील, आजी-आजोबा लग्न कार्यासाठी बाहेर गावाला गेले होते. घरी त्याची आई चंद्रकला (३०) हजर होती. मुलगा मंदिरात खेळत आहे असा त्या मातेचा समज झाला. जेवणासाठी ती बोलवायला परिसरात गेली असता तिला नितीन आढळून आला नाही. मुलगा दिसत नाही म्हणून तिने सकाळच्या १०.३० वाजतापासून नितीनचा शोध घेणे सुरू केले. आपला एकुलता एक मुलगा असलेला नितीन एका-एकी कुठे गेला याच विचारात आईने दिवसभर हंबरडा फोडला. आपल्या आप्तस्वकीय व नातलगाच्या सहाय्याचे संपूर्ण गाव पिंजून काढले. परंतु कुठेही नितीनचा ठावठिकाणा लागला नाही.
परिसरात सर्वत्र आवडता असलेल्या नितीनचे कोणी अपहरण तर केले नाही ना? अशी शंका वर्तविण्यात आली. सर्वत्र शोधाशोध करूनही कोणताच सुगावा लागत नाही. त्यामुळे रात्री बऱ्याच उशिरा नितीनची आई चंद्रकलाबाईने आपल्या मुलाला कोणीतरी पळवून नेले असा संशय व्यक्त करणारी तक्रार पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीवरून पोलीस ताफा गावात आला. गावातील तलाव, बोडी, काही विहीरीसुध्दा पाहून घेतल्या, परंतु नितीनचा ठावठिकाणा लागला नाही.
एकुलता एक मुलगा गायब झाल्याची वार्ता नातलगांमध्ये पसरताच सर्व नातलग आले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. अखेर एका नातलगाने मंदिरातील विहीरीमध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अंदाजे ३.३० वाजताच्या सुमारास नितीनचा मृतदेह पाण्यामध्ये दिसून आला. घराजवळून अवघ्या काही अंतरावर असलेल्या विहीरीमध्ये २९ तासानंतर त्या गोंडस मुलाचा मृतदेह होता. फुलाप्रमाणे नितीनला सांभाळणाऱ्या मातेला खेळत्या बागडत्या नितीनचा मृतदेहच हाती लागल्याने तिला शोक अनावर झाला होता. ते पाहून ग्रामवासीयांचेही डोळे पाणावले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवचिकीत्सेसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोरगाव येथे पाठविण्यात आला. ठाणेदार नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश गझल पुढील तपास करीत आहे.
नितीन त्या विहिरीमध्ये पडला की काही घातपात झाला? त्यावेळी तिथे कोणीच नव्हते का? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.(वार्ताहर)