अखेर पतीच निघाला पत्नीचा खुनी
By Admin | Updated: October 8, 2014 23:28 IST2014-10-08T23:28:01+5:302014-10-08T23:28:01+5:30
बायकोचे नटून-थटून राहणे नवऱ्याला पसंत नव्हते. त्यामुळे त्याने कामाला जाणेच सोडले आणि तो दारुच्या आहारी गेला. आपण कवडीही कमवित नाही, मात्र आपली पत्नी नटूनथटून कशी राहते? कुठून पैसा अणते?

अखेर पतीच निघाला पत्नीचा खुनी
नरेश रहिले - गोंदिया
बायकोचे नटून-थटून राहणे नवऱ्याला पसंत नव्हते. त्यामुळे त्याने कामाला जाणेच सोडले आणि तो दारुच्या आहारी गेला. आपण कवडीही कमवित नाही, मात्र आपली पत्नी नटूनथटून कशी राहते? कुठून पैसा अणते? हे विचार त्याला खात होते. यातूनच त्याने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणे सुरू केले आणि अखेर त्याच्या डोक्यातील संशयाच्या भुताने पत्नीता बळी घेतला.
गेल्या २ आॅक्टोबरला घडलेल्या या घटनेचा माग काढण्यात अखेर पोलिसांना यश आले. ५ आॅक्टोबरला आढळलेला मृतावस्थेत आढळलेल्या त्या महिलेचा तिच्या पतीनेच गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोरेगाव तालुक्याच्या चिल्हाटी येथील नरेश यादोराव मेश्राम (३०) याचा गोंदियाच्या संजय नगरातील माधुरी हिच्यासोबत सन २०१० मध्ये विवाह झाला. त्यांनी तीन वर्ष सुखाने संसार चालविला. यातून त्या दोघांना दोन मुली झाल्या. एक मुलगी साडेतीन वर्षाची तर दुसरी दोन वर्षाची आहे. मागील वर्षभरापासून माधुरीला माहेरचे वेड लागले होते. पती बाहेरगावी कामाला गेला की, माधुरी मुलींना घेऊन माहेरचा रस्ता धरायची. यामुळे नरेशला तिचा राग आला. ‘मी नसल्यावर तू माहेरी का जातेस’ असे म्हणून नरेशने कामावर जाणे सोडले व त्याने दारू पिणे सुरू केले. तरीही माधुरीची फॅशनेबलने राहण्याची पद्धत बदलली नाही.
आपण पाच पैसेही कमवित नाही, तरीसुद्धा माधुरी फॅशनेबल राहते कशी, तिच्याकडे पैसा कुठून येतो, असा विचार करुन नरेशच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण झाला. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यामुळे १५ दिवसापूर्वी माधुरी व नरेश या दोघांत वाद झाला. या वादामुळे माधुरी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी गेली. यानंतर आठवड्याभराने नरेशने तिचा काटा काढण्याचा चंग बांधला. २ आॅक्टोबर रोजी नरेश दुपारी १२ वाजतादरम्यान संजयनगर परिसरात गेल्यावर त्याने पत्नी माधुरीला फोन केला. तुझ्या नावाची शिलाई मशीन व २००० रुपये आयटीआय गोरेगाव येथे आले आहेत. त्यासाठी ते आणायला तू चल, असे सांगितले. त्यामुळे ती नवऱ्याला भेटायला संजयनगर येथील नाल्यावर गेली.
बहिणीची साडी घालून गेलेल्या माधुरीला नरेशने स्कुटी (एमएच ३५/आर ९५४६) वर बसवून नेले. त्याने तिला आधी गोरेगावच्या आयटीआय येथे नेले, परंतु तो दिवस महात्मा गांधी यांच्या जयंतीचा असल्याने सर्व कार्यालय बंद होते. त्यानंतर त्याने तिला फिरायला नेतो असे सांगितले. दोघेही सोनी येथील एका हॉटेलात गेले. त्यांनी तिथे नास्ता केला. त्यानंतर फिरुन येऊ असे बोलून नरेशने माधुरीला जंगलात नेले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास धावडीटोला येथील जंगल परिसरात तिचा गळा आवळून खून केला व मृतदेह टेकडीवर टाकला. त्यानंतर नरेश ती स्कुटी घेऊन मोहाडीला गेला. आपल्या मित्राकडे ती स्कुटी ठेवून तो दीक्षाभूमी नागपूर येथे निघाला. माधुरीने माहेरच्या लोकांना सायंकाळपर्यंत येतो असे सांगितले होते. परंतु ती सायंकाळी घरी न परतल्यामुळे तिच्या भावाने चिल्हाटी येथील बीडी ठेकेदाराला फोन केल्यावर त्याने ती आली नसल्याची माहिती दिली. नरेशही आला नसल्याची माहिती दिली.
दोन दिवस नातेवकाईकांनी तिचा इतरत्र शोध घेतला. मात्र ती न दिसल्याने गोंदिया शहर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. ५ आॅक्टोबर रोजी आमगाव तालुक्याच्या धावडीटोला येथील पहाडीवर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. याची माहिती चिल्हाटी येथील बीडी ठेकेदाराने माधुरीच्या भावाला दिली. माधुरीचा भाऊ व मावसभाऊ दोघेही धावडीटोला येथील घटनास्थळावर आल्यावर साडी, ब्लाऊज व तिच्या पायात असलेल्या मोज्यावरुन तिची ओळख पटली. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास करताना पहिला संशय पतीवर गेला. पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपास केल्यावर माधुरीच्या नावाने गोरेगावच्या आयटीआयमध्ये तिच्या नावाने कसलीच मशीन किंवा २००० रुपये आले नाहीत.
तिचा काटा काढण्यासाठी नरेशने कट रचल्याचे निष्पन्न झाले. पत्नीच्या फॅशनेबल राहणीमानामुळे पती नरेशने चारित्र्यावर संशय घेवून तिचा खून केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केला.