आमदारांच्या टेबलावर मांडले कुजलेल्या धानाचे भारे

By Admin | Updated: November 9, 2015 05:10 IST2015-11-09T05:10:45+5:302015-11-09T05:10:45+5:30

आमदार संजय पुराम यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी हल्ला चढवून थेट त्यांच्या

Filled with leftovers on the table of MLAs | आमदारांच्या टेबलावर मांडले कुजलेल्या धानाचे भारे

आमदारांच्या टेबलावर मांडले कुजलेल्या धानाचे भारे

सालेकसा : आमदार संजय पुराम यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी हल्ला चढवून थेट त्यांच्या टेबलावरच कुजलेल्या धानाचे भारे मांडले. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी रेटून धरत शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे आवार दणाणून सोडले. यावर आमदारांनी कृषीमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना परिस्थिती सांगणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली.
तालुक्यात धानपिकांवर रोगांचा एवढा प्रादुर्भाव झाला की, सर्वत्र धानाचे पीक नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना धान स्वरूपात काहीच हाती येणार नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या जनावरांसाठी तणसही निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसह जनावरांच्या चाऱ्याची चिंताही सतावू लागली आहे. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींसह आमदार व खासदारांपर्यंत समस्यांचे निवेदन सादर केले. यात शेतकऱ्यांना कुठेही मदतीची हमी देण्यात आली नाही. धानपीक नष्ट झाल्याने शेकडो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात दिसत आहे.
काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर लाखे रूपये खर्चून आज त्यांच्या हाती १० टक्केही लागणार नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यात मदतीची हमी नसल्याने काय करू-काय नाही अशी स्थिती असल्याचे शेतकरी बोलत आहेत. शेतकऱ्यांना दिलास देण्यासाठी मागील आठ-दहा दिवसांपासून तहसीलदार प्रशांत सांगळे, पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, पंचायत समिती कृषी अधिकारी मडावे, जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, पंचायत समिती सदस्य प्रतिभा परिहार, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, दुर्गा तिराले, समाजकल्याण देवराज वडगाये यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आपापल्या सोयीनुसार तालुक्यात दौरा केला. दौऱ्यात त्यांनी शेतातील पिकांची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली. मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यापलीकडे त्यांच्याकडून मदतीची हमी कुणीच दिली नाही.
हा सर्व प्रकार सुरू असताना, शनिवारी (दि.७) पंचायत समिती सभागृहात आमदार पुराम यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या आमदारांपुढे मांडण्याचे ठरविले. ठरविल्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैठकीला उपस्थित महसूल, कृषी, शिक्षण, सिंचन, वनीकरण व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे धडक दिली.
याप्रसंगी शेतकऱ्यांनी शासनाकडून मदतीची मागणी करीत अवघा सभागृह दणाणून सोडला. शेतकऱ्यांच्या या रौद्र रूप पुढे बैठकीतील अन्य कामकाज तर होऊच शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)

आमदारांनी काढले मुंबईचे तिकीट
४शेतकऱ्यांचे रौद्ररूप बघता आढावा बैठकीत उपस्थित अधिकारी आपल्या विभागाचा लोखा-जोखा मांडू शकले नाही. उलट शेतकऱ्यांचे हे प्रदर्शन बघता सर्वच अवाक झाले. चक्क आमदारांच्या टेबलावरच कुजलेल्या धानाचे भारे मांडण्यात आल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. शेतकऱ्यांचा गराडा बघता आ. पुराम यांनी योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन देत लगेच कृषिमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईचे तिकीट काढत असल्याचे सांगितले.

Web Title: Filled with leftovers on the table of MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.