पदाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: May 1, 2016 01:52 IST2016-05-01T01:52:08+5:302016-05-01T01:52:08+5:30
नव्यानेच सडक-अर्जुनीला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे चांगले कामे होतील अर्जुनीचा विकास होईल असे गावकऱ्यांना वाटत होते.

पदाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा
सडक-अर्जुनीतील प्रकार : काम झाल्यावर काढली निविदा
सडक-अर्जुनी : नव्यानेच सडक-अर्जुनीला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे चांगले कामे होतील अर्जुनीचा विकास होईल असे गावकऱ्यांना वाटत होते. परंतु नव्याने निवडून आलेले नगर पंचायतचे काही सदस्य आणि मुख्याधिकारी नियमबाह्य कामे करून भ्रष्टाचार करण्याच्या कामात लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी नगरसेवक दिनेश अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांचेकडे केली आहे. जिल्हाधिकारी कारवाई करीत नसतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडे करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रकरण असे की सडक-अर्जुनी नगर पंचायतने सडक-अर्जुनी गावातील नाल्यांचा मलबा काढणे व फेकणे हे काम ८ फेब्रुवारी २०१६ पासून सुरू केले आहे. हे उपलब्ध रेकार्ड माहिती अधिकारात उपलब्ध झाली आहे. परंतु शासनाचा पैसा कसा लुटता येईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून नगरपंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांचेशी साटेलोटे करून दिनांक १५ एप्रिल २०१६ रोजी एका मराठी दैनिकात जाहिरात प्रकाशित केली. नगर पंचायत हद्दीतील नाल्यातील मलबा फेकण्याची निविदा मागविली. त्या प्रकाशित निविदेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्तीचा उल्लेख केलेला नाही. त्या कधी उघडण्यात येईल याचाही उल्लेख नाही फक्त आपल्या निविदा २० एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावा एवढाच उल्लेख करण्यात आला आहे.
८ फेब्रुवारी २०१६ पासून नाल्याचा मलबा काढणे व फेकण्याचे काम सुरू असून जवळपास ७० ते ८० टक्के पूर्णही झालेले असतांना १५ एप्रिल रोजी जाहिरात दिली. २० एप्रिल पर्यंत निविदा मागविण्याची गरज म्हणजे फक्त देखावा असून भ्रष्टाचार करणे एवढाच एकमेव उद्देश दिसून येते. अशा भ्रष्ट पदाधिकारी आणि अधिकऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी आणि प्रामाणिकपणे गावाचा विकास करावा. विकासाला विरोध नसून भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे मत विरोधी पक्षनेता दिनेश अग्रवाल यांचे आहे.
त्यांनी लिखीत तक्रारीच्या प्रति जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त नागपुर, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन व पालकमंत्री यांना दिल्या आहेत. भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल कारवाईची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)