डोळे बंद करून ओळखते आकडे व रंग
By Admin | Updated: June 3, 2015 01:15 IST2015-06-03T01:15:41+5:302015-06-03T01:15:41+5:30
आधुनिक युगात मानवनिर्मित तंत्रज्ञानाने सर्वांना थक्क करुन सोडले आहे. विविध संशोधनात्मक वृत्तीमुळे व्यक्तीलाच ‘सेंसर मेमरी’ची ओळख झाली आहे.

डोळे बंद करून ओळखते आकडे व रंग
आठ वर्षीय पवित्राची कमाल : ‘सेंसर मेमरी’ने केली कला अवगत
आमगाव : आधुनिक युगात मानवनिर्मित तंत्रज्ञानाने सर्वांना थक्क करुन सोडले आहे. विविध संशोधनात्मक वृत्तीमुळे व्यक्तीलाच ‘सेंसर मेमरी’ची ओळख झाली आहे. येथील पवित्रा या आठ वर्षीय पालिकेने याच मेमरीच्या माध्यमातून अवगत केलेल्या सेंसर मेमरीने पाहणाऱ्यांना थक्क करून सोडणारी कला अवगत केली आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून नोटांचे, आधार कार्डवरील नंबरसह विविध वस्तू ओळखण्याची कला तिने अवगत केली आहे.
आमगाव शहरातील मुख्य भागात राहणाऱ्या पवित्रा सुरेश उपाध्याय या आठ वर्षीय मुलीने सेंसर मेमोरीच्या माध्यमाने स्वत:ची इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली आहे. पवित्रा ही स्थानिक स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. कुटुंबात सामान्य राहणीमानात वावरणारी पवित्रा लहानपणापासून स्वत:तील गुणचातुर्यामुळे गुणवंत ठरत आहे. कोणत्याही वस्तुची ओळख नसताना इतरांना त्याबद्दल माहिती करुन देण्याची कला अवगत करुन घेतली आहे. त्यामुळे आधार कार्डवरील नंबर, अंकगणित, याचबरोबर विविध रंगांची ओळख ती डोळे झाकून करुन देते. विशेषत: ती नंबरांची अथवा कागदाची ओळख केवळ त्याचा गंध घेऊन सांगते. एखाद्या कागदावरील आकडा अवगत करताना ती कानाजवळ त्या वस्तुंचा आवाज करुन सहजपणे त्या कागदावरील आकडा ओळखते. तिचे हे अद्भूत चातुर्य थक्क करून सोडते.
ड्रॉर्इंग बुकमधील रेखाचित्रावर ती न पाहता रंग भरुन ते चित्र सुुशोभित करुन दाखविते. भविष्यात सेंसर मेमरीच्या सहाय्याने ती सायकलिंग करण्याचे धाडस करणार, असा मानस तिने व्यक्त केला आहे. नृत्य, संगीत व पोहण्याची आवड असणाऱ्या पवित्राने भविष्यात सिनेमात काम करण्याची इच्छा दर्शविली आहे. सध्या तिची ही कला शहरात कौतुकाचा विषय झाली आहे. आपल्याला अवगत झालेली ही कला म्हणजे देवाची देणगी आहे असेही ती सांगते. ही कला म्हणजे कोणतीही जादू नाही तर ते सरावाने अवगत केलेले तंत्रज्ञान आहे. (शहर प्रतिनिधी)