महागाईच्या तडाख्याने सणासुदींचा गोडवा फिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST2021-08-13T04:33:09+5:302021-08-13T04:33:09+5:30
कपिल केकत गोंदिया : जीवतीपासून हिंदू धर्मीयांच्या सणासुदीला सुरूवात होत असून प्रत्येकच सणात गोडधोड बनविले जातेच. मात्र महागाईमुळे दोन ...

महागाईच्या तडाख्याने सणासुदींचा गोडवा फिका
कपिल केकत
गोंदिया : जीवतीपासून हिंदू धर्मीयांच्या सणासुदीला सुरूवात होत असून प्रत्येकच सणात गोडधोड बनविले जातेच. मात्र महागाईमुळे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न पडत असताना त्यात आता सणासुदींना सुरूवात झाली असूनही ते फिकेच वाटत आहे. सध्या साखरेत हलकी दरवाढ दिसत असून ३४ रूपये प्रती किलो दर आहे. आता सणावाराला सुरूवात झाल्याने साखरेला मागणी वाढली व अशात साखर भडकली तर, मात्र सणासुदीचा गोडवा कमी होणार यात शंका वाटत नाही.
------------------------------
साखरेत हलकी दरवाढ
जिल्ह्यात साखर सोलापूर व नांदेड येथून येते. त्या भागात उसाची चांगली लागवड होत असून आता आपल्या भागातही ऊस लागवड होत आहे. परिणामी साखरेचे दर फारसे वाढलेले नाही. साखरेत मागील काही महिन्यात १-२ रुपयांचा फरक दिसत आहे.
- रितेश नागदेव (व्यापारी)
-------------------------
आता सणासुदीला सुरूवात होत असल्यामुळे साखरेची मागणी वाढणार यात शंका नाही. मात्र मागील काही महिन्यांपासून साखरेचे दर फारसे वाढलेले नाही. सुरळीत पुरवठा सुरू असल्यामुळे साखर निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते.
- अंकित खटवानी (व्यापारी)
-------------------------
जिल्ह्याला दररोज लागते साखर (क्विंटलमध्ये) - ११० क्विंटल
श्रावणात मागणी वाढली - १७५ क्विंटल
२) साखरेचे दर (प्रति किलो)
जानेवारी - ३३.५०
फेब्रुवारी - ३३.५०
मार्च - ३३.६०
एप्रिल - ३३.६०
मे - ३३.६०
जून -३३.६०
जुलै - ३४
ऑगस्ट - ३४
-------------------------
महिन्याचे बजेट वाढले
- मागील वर्षभरापासून महागाई झपाट्याने वाढली असून भाजीपाला व किराणा सामान चांगलेच भडकले आहे. परिणामी दररोजच्या जेवणाचा प्रश्न असतानाच आता सणासुदीत काय करावे असा प्रश्न पडला आहे. साखरेचे दर जास्त चढले नसले तरीही महागाईमुळे बजेट तर कोलमडले आहेच.
- ममता कावळे (गृहिणी)
----------------------------
आज प्रत्येकच वस्तूंचे भाव वाढले असून किराणा माल व भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम पडतो. आता सणासुदीला सुरूवात झाली असून सर्वच वस्तूंची मागणी वाढणार आहे. साखर अन्य वस्तूंप्रमाणे वधारली नसली तरीही अन्य वस्तूंमुळे तर बजेट कोलमडले आहेच त्याचे काय.
- सुवर्णा कदम (गृहिणी)