‘त्यांचा’ हार-फुलांनी सत्कार
By Admin | Updated: February 8, 2016 01:48 IST2016-02-08T01:48:37+5:302016-02-08T01:48:37+5:30
उघड्यावर शौच करीत असलेल्या बहाद्दरांचा हार व फुलांनी सत्कार करण्याचा आगळावेगळा उपक्रम पालिकेच्या ‘गुड मॉर्निंग पथकाने’ हाती घेतला आहे.

‘त्यांचा’ हार-फुलांनी सत्कार
कपिल केकत गोंदिया
उघड्यावर शौच करीत असलेल्या बहाद्दरांचा हार व फुलांनी सत्कार करण्याचा आगळावेगळा उपक्रम पालिकेच्या ‘गुड मॉर्निंग पथकाने’ हाती घेतला आहे. उघड्यावरील शौचाच्या प्रकारावर आळा बसावा व अशा शौच बहाद्दरांत शौचालय बांधकामाबाबत जनजागृती निर्माण करता यावी, यासाठी पालिकेने या पथकाने गठन केले असून शहरातील विविध भागांत हे पथक सकाळी हा उपक्रम राबवित आहे.
ग्रामीण भागातच उघड्यावरील शौचाचा प्रकार होतो असे आपणास वाटते. मात्र ही वास्तवीकता नसून शहरातही हा प्रकार आजही सुरूच आहे. आजही शहरातील कित्येक परिवारांकडे शौचालय नाही. अशात त्यांना दररोज सकाळी उघड्यावर शौच करावे लागत आहे. परिणामी हागणदारीमुक्तीचा शासनाचा संकल्प अद्याप फलीतास आला नाही. हागणदारी मुक्तीसाठी शासनाकडून अभियान राबवून त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र नागरिकांत जोपर्यंत जागृती येत नाही तोवर या अभियानाचा काहीच उपयोग नाही हे यातून सिद्ध होते.
शहरातही उघड्यावरील शौचाचे हे प्रकार सुरू असून हा प्रकार संपुष्टात यावा व वातावरण दूषित होऊ नये यासाठी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत नागरी शौचालय बांधकामाची मोहीम शासन राबवित आहे. नगर परिषदेतही शौचालय बांधकामाची ही मोहीम सुरू असून शौचालय नसलेल्या परिवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हजारांच्या घरात शौचालयांचे बांधकाम सुरू असून आणखीही परिवारांना शौचालयांचे बांधकाम अनुदान तत्वावर करवून दिले जाणार आहे.
असे असतानाही एकही कुटूंब यापासून सुटू नये व उघड्यावरील शौचाचा प्रकार शहरात होऊ नये. या प्रकारातून निर्माण होणारी रोगराईची स्थिती शहरात हातपाय पसरू नये या दृष्टीने शौचालय बांधकामासोबतच पालिकेने आता एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पालिकेने ‘गुड मॉर्निंग पथक’ गठीत केले आहे.
हे ‘गुड मॉर्निंग पथक’आठवड्यातील तीन दिवस शहरातील विविध भागांत जाऊन उघड्यावर शौच करणाऱ्यांचा हार घालून किंवा फुल देऊन सत्कार करीत आहेत. यातून हे पथक समोरच्या व्यक्तीला तो किती मोठी चूक करीत आहे याची कल्पना करवून देत आहे. तसेच या माध्यमातून शौचालय बांधकामाबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे.
मोहीम सकाळी ६.३० वाजतापासून
सकाळी ६.३० वाजतापासून पथकाची ही मोहीम सुरू होते. शहराच्या बाहेरील भागात येत असलेल्या मरारटोली, पिंडकेपार, सुंदरनगर, सुर्याटोला, छोटा गोंदिया आदी परिसरांत उघड्यावरील शौचाचे प्रकार आजही सुरू आहेत. त्यामुळे या भागांत जावून जनजागृतीचा हा कार्यक्रम राबवित आहेत. नागरिकांत जनजागृती आल्यावरच उघड्यावरील शौचाच्या प्रकारावर आळा बसेल ही बाब हेरूनच पालिकेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पथकात कुणाचा समावेश?
पालिके ने गठीत केलेल्या ‘गुड मॉर्निंग पथका’त प्रशासनिक अधिकारी सी.ए. राणे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कनिष्ठ अभियंता फिरोज बिसेन, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नूतन कोरडे, आरोग्य निरीक्षक पुरूषोत्तम मनकवडे, गणेश हतकय्या, मनिष बैरीसाल, मुकेश शेंद्रे, मुकेश तिवारी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ हे सुद्धा या पथकासोबत शहरातील विविध भागांत जाऊन पाहणी करीत आहेत.