फेडरेशनचे चार लाख क्विंटल धान उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:08+5:30

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा हमीभाव अधिक असल्याने या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत एकूण ३४ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.

The Federation's four million quintals of paddy on open place | फेडरेशनचे चार लाख क्विंटल धान उघड्यावरच

फेडरेशनचे चार लाख क्विंटल धान उघड्यावरच

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे वेळकाढू धोरण : तांदळाची उचल संथगतीने, नुकसानीचा आकडा लपविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात पडून असलेल्या मागील वर्षीच्या तांदळाची उचल अद्यापही संथगतीने सुरू असल्याने भरडाईसाठी १३ लाख क्विंटल धान प्रतीक्षेत आहेत. तर खरेदी केलेला चार लाख क्विंटल धान अद्यापही केंद्रावर उघड्यावर पडून आहे. या धानाला २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. मात्र यानंतरही जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा हमीभाव अधिक असल्याने या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत एकूण ३४ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.आदिवासी विकास महामंडळाचे धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था न करण्यात आल्याने हा धान तसाच ४४ केंद्रावर ताडपत्र्या झाकून ठेवण्यात आला आहे. या विभागाचे सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होऊनही त्यांनीही यावर उपाय योजना केली नाही. परिणामी धानाची चोरी आणि नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
यंदा हीच वेळ जिल्हा मार्केटिंग फेडरेशनवर आली आहे. फेडरेशनने आत्तापर्यंत २४ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. यापैकी १३ लाख क्विंटल धान भरडाईसाठी करार केलेल्या २८६ राईस मिलर्सकडे पाठविण्यात आला आहे. तर फेडरेशनकडे केवळ ८ लाख क्विंटल धान साठवून ठेवण्यासाठी गोदामे उपलब्ध आहे.मात्र यंदा एफसीआयच्या गोदामांमध्ये मागील वर्षीचा ६० हजार मेट्रीक टन तांदूळ पडून होता.
यापैकी आतापर्यंत केवळ २० हजार मेट्रीक टन तांदळाची उचल करण्यात आली. तर अद्यापही ४० हजार मेट्रीक टन तांदूळ गोदामात पडून असल्याने नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवण्यासाठी गोदामांमध्ये जागा शिल्लक नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धान भरडाईच्या प्रतीक्षेत गोदामात आणि जिल्ह्यातील ६६ धान खरेदी केंद्रावर उघड्यावर पडून आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन दिलेल्या माहितीनुसार उघड्यावर जवळपास चार लाख क्विंटल धान मागील पंधरा दिवसांपासून पडला आहे.
मागील दहा दिवसांपासून भरडाईसाठी धानाची उचल करण्याची प्रक्रिया फारच संथगतीने सुरू असल्याने याचा फटका खरेदी केंद्रावर धान विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

दिंरगाईचा फटका शेतकऱ्यांना
जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रावर नेले. मात्र केंद्रावर धानाचे काटे होण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे धान केंद्रावर उघड्यावर काटे होण्याचे प्रतीक्षेत पडून आहे. सोमवारी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे धान भिजल्याने त्यांना कोंब फुटली. आता हे धान खरेदी करण्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. तर जोपर्यंत धानाचा काटा होत नाही तोपर्यंत धानाचे संरक्षण करण्याची जवाबदारी ही शेतकऱ्यांची असते. नेमक्या या अटीचा फायदा केंद्र चालक घेत आहे. मात्र यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Web Title: The Federation's four million quintals of paddy on open place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.