केंद्रावरील १६ लाख क्विंटल धानाने वाढला फेडरेशनचा बीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:02+5:302021-02-05T07:45:02+5:30
गोंदिया : राईस मिलर्स असोसिएशन शासकीय धानाची उचल करुन भरडाई करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी ...

केंद्रावरील १६ लाख क्विंटल धानाने वाढला फेडरेशनचा बीपी
गोंदिया : राईस मिलर्स असोसिएशन शासकीय धानाची उचल करुन भरडाई करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला धान जिल्ह्यातील ७० धान खरेदी केंद्रावरुन तसाच पडून आहे. राईस मिलर्स आणि शासन यांच्यात अद्यापही कुठल्याही वाटाघाटी होऊन तोडगा न निघाल्याने केंद्रावर धान तसाच पडून आहे. यामुळे फेडरेशनच्या अधिकाऱ्यांच्या बीपी वाढला असून यावर तोडगा न निघाल्यास याचा धान खरेदीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभावाने शासकीय धान केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा धानाला प्रति क्विटंल १८६८ हमीभाव आणि ७०० रुपये प्रति क्विटंल बोनस मिळत असल्याने यंदा धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगामात ३५ लाख क्विटंल धान खरेदीचे नियोजन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केले आहे. याच अंतर्गत आतापर्यंत १६ लाख क्विटंल धान खरेदी करण्यात आली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करुन तो शासनाकडे जमा केला जातो. धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो. त्यामुळे करारनामे झाल्यानंतर राईस मिलर्स धानाची उचल करतात. त्यामुळे खरेदी केंद्रावर धान शिल्लक राहत नाही. पण यंदा राईस मिलर्स असोसिएशनने धान भरडाईचे दर निश्चित करणे, धानाच्या वाहतूक भाड्याची तीन वर्षापासून थकीत असलेली रक्कम देणे, खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची गुणवत्ता तपासणी करणे यासह अन्य मागण्यांना घेऊन आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शासकीय धानाची भरडाई न करण्याची भूमिका घेतली आहे. पण शासनाने यावर अद्यापही तोडगा न काढल्याने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला १६ लाख क्विटंल धान तसाच ताडपत्र्या झाकून पडलेला आहे. गोदाम देखील भरले असल्याने आणि खरेदी केंद्रावर धान ठेवण्यासाठी जागा नसल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची चिंता वाढली असून याचा शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसत आहे.
.......
तर धान खरेदी होणार ठप्प
शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाची अद्यापही उचल झाली नसल्याने सर्वच ७० धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धान तसाच पडला आहे. त्यामुळे नवीन खरेदी केलेला धान ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर त्वरित तोडगा न निघाल्यास धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता आहे.
.....