प्रतापगडावर भक्तीचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 00:15 IST2017-02-25T00:15:36+5:302017-02-25T00:15:36+5:30
हिंदू-मुस्लिम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखो भाविकांनी शुक्रवारी दर्शन घेतले.

प्रतापगडावर भक्तीचा महापूर
हर-हर महादेवचा गजर : नेत्यांची उपस्थिती मात्र उत्साह ओसरलेला, भाविकांची श्रद्धा व आकर्षण कायम
अर्जुनी मोरगाव : हिंदू-मुस्लिम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखो भाविकांनी शुक्रवारी दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत भाविकांनी अलोट गर्दी केली. ही यात्रा पाच दिवस चालणार आहे. त्यात सुटीचे दिवस आल्याने प्रतापगड गर्दीने अजून फुलण्याची शक्यता आहे.
महाशिवरात्री पर्वावर प्रतापगड येथे मोठी यात्रा असते. हिंदू बांधव महादेव पहाडीवर तर मुस्लीम बांधव ख्वाजा उस्मान गनी हारुनी बाबांचे दर्शन मोठ्या भक्तीभावाने घेतात. हातात त्रिशुल व मुखात हर-हर महादेव असा गजर करीत गुरुवारपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. वाहतुकीवर निर्बंध घातले असल्याने आतमध्ये गर्दी कमी झाली होती. मात्र दर्शनासाठी विविध मार्ग तयार करण्यात आल्याने दर्शन घेण्यासाठी जाणारे भाविक व येणारे भाविक निघून जात असल्याने गर्दी दिसून येत नव्हती. सुमारे चार लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले.
येथे राजकीय नेत्यांची मांदियाळी असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.प्रफुल्ल पटेल तसेच भाजपचे खा.नाना पटोले व ना.राजकुमार बडोले मित्र परिवारातर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण केले जाते. यावेळी खा.पटेल गोंदियात नसल्यामुळे येथे आले नाही, मात्र मनोहरभााई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल त्यांच्या कन्या अवनी पटेल, पूर्णा पटेल, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे निखील जैन व राजू एन. जैन यांनी येऊन दर्ग्यावर चादर चढविली व गावात असलेल्या शिवमंदिराचे दर्शन घेतले. पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री सायंकाळी पाच वाजता येथे उपस्थित झाले. तर खा.नाना पटोले हे सकाळपासूनच येथे हजर झाले. त्यांंनी महादेव पहाडीवर दर्शन घेतले. शेतकऱ्यांमध्ये सुखसमृद्धी व नवचैतन्य लाभो असे साकडे घातले.
महाशिवरात्री पर्वावर प्रतापगड भाविकांंनी फुलणार असल्याची प्रचिती प्रशासनाला होती. त्यादृष्टीने चोख बंदोबस्त होता. दर्शनासाठी पहाडावर प्रचंड गर्दी केली होती. महत्वाच्या ठिकाणी प्रशासनातर्फे आरोग्य सुविधा, पाण्याची सुविधा, एस.टी. बसची विशेष सोय, सीसीटिव्ही कॅमेरे आदिची व्यवस्था होती. मात्र खालचे पाणी वरपर्यंत जात नसल्याने काही सामाजिक संघटनांनी आपल्या वतीने वर पाण्याची व्यवस्था केली. मुस्लीम कमिटीतर्फे उर्स व कव्वालीचे आयोजन केले आहे.
सामाजिक संघटनांचे योगदान
महाशिवरात्री पर्वावर प्रतापगडच्या प्रवासासाठी अर्जुनी मोरगाव येथे मोठी गर्दी असते. अर्जुनी मोरगाव मित्र परिवारातर्फे महाराणा चौकात महाप्रसाद व प्याऊची व्यवस्था यात्रेकरुंसाठी करण्यात आली होती. नगर पंचायतचे उपाध्यक्ष विजय कापगते, न.प. सभापती माणिक मसराम, नगरसेवक देवेंद्र टेंभरे, श्याम चांडक, चिंतामण झलके, मंगेश बारई, सुरेंद्र ठवरे, किशोर सुरपाम, महेंद्र मिस्त्री, रतन टेंभुर्णे, चंदू तागडे, विलास मिस्‘त्री, दूपेंद्र बिसेन, निश्चल नशिने, जांभुळकर पेंटर, अजित दहिवले, लक्की ब्राम्हणकर, राजू ब्राम्हणकर यांनी ही व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती. प्रतापगड येथे सुद्धा ठिकठिकाणी प्याऊची व्यवस्था केली होती. श्री अम्मा भगवान परिवार अर्जुनी मोरगाव यांचेतर्फे पिण्याचे पाणी व सरबत उपलब्ध करण्यात आले होते.