प्रतापगडावर भक्तीचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 01:44 IST2016-03-08T01:44:22+5:302016-03-08T01:44:22+5:30
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगड या तीर्थस्थळावर सोमवारी सुमारे दोन लाखांवर भाविकांनी

प्रतापगडावर भक्तीचा महापूर
अर्जुनी मोरगाव : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगड या तीर्थस्थळावर सोमवारी सुमारे दोन लाखांवर भाविकांनी भोलाशंकर तर मुस्लीम बांधवांनी ख्वाजा उस्मान गणी हारुनी बाबांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची येथे अलोट गर्दी लोटली होती.
मांगल्य जपणारा, आनंद देणारा व बंधुभाव वाढविणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाला येथे अत्याधिक महत्व व श्रद्धा आहे. त्यामुळेच हातात त्रिशुल व मुखात ‘महादेवा जातो गा... हर बोला हर हर महादेव’चा गरज करत भाविक मोठ्या संख्येत रविवारपासूनच डेरेदाखल झाले. अनेक भागातून भाविकांचे जत्थे येथे दाखल झाल्याचे दिसून येत होते.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खा.प्रफुल्ल पटेल, खा.नाना पटोले, आ.राजेंद्र जैन व मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल, राष्ट्रवादीच्या युवा नेत्या पूर्णा पटेल यांनी आवर्जून या यात्रेला हजेरी लावली. त्यांनी महाप्रसाद वितरणातही सहभाग घेतला. भल्या पहाटेपासून भक्तजणांच्या गर्दीने प्रतापगड फुलले होते. सकाळी ११ वाजतानंतर भाविकांनी प्रचंड गर्दी केली. वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असल्याने भाविकांचे आवागमन सायंकाळपर्यंत सुरूच होते.
महाशिवरात्री यावर्षी महादेवाचा दिवस सोमवारी आल्याने प्रतापगड भाविकांनी फुलणार असल्याची प्रचिती प्रशासनाला होती. त्यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यात्रास्थळी वाहतुकीवर निर्बंध घातल्याने वाहनांची गर्दी कमी झाली. हे अगदी सोईचे झाले, मात्र भाविकांना बरेच अंतर पायपीट करावी लागली. स्व.मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या वतीने तसेच खा.नाना पटोले व ना.राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले होते. (तालुका प्रतिनिधी)
पटेल दाम्पत्याकडून
मांगल्याची मागणी
४महाशिवरात्रीच्या पर्वावर खा.प्रफुल्ल पटेल, मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल, पूर्णा पटेल, आ.राजेंद्र जैन यांनी प्रतापगडसह गोंदिया तालुक्यातील नागरा येथे दर्शन घेऊन जिल्ह्यातील नागरिकांसाठी मांगल्याची कामना केली. प्रतापगड यात्रेत त्यांनी दूरवरून आलेल्या भक्तगणांची आस्थेने विचारपूस केली. तसेच दर्शनार्थी भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले. यावेळी त्यांनी स्वत:ही महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी नामदेवराव डोंगरवार, मनोहर चंद्रीकापुरे, राजू एन.जैन, किशोर तरोणे, बंडू भेंडारकर, यशवंत गणवीर, भास्कर आत्राम, उद्धव मेहेंदळे, यशवंत परशुरामकर, सुधीर साधवानी, शिशुला हलमारे, नाजुकाबाई कुंभरे, सोमदास गणवीर, श्यामकांत नेवारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते होते.
चोख बंदोबस्त आणि सुविधा
४पोलीस प्रशासनाच्या वतीने कालीमाती-प्रतापगड, कढोली-प्रतापगड व तिबेट कॅम्प-प्रतापगड मार्गावर गावाच्या सिमेबाहेर सुमारे २-३ कि.मी. अंतरावर वाहने थांबविण्यात आल्याने भाविकांची थोडीफार गैरसोय झाली. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्य होते.
४ यावेळी फिरते शौचालय व ठिकठिकाणी मुतारींची व्यवस्था करण्यात आली. पंचायत समितीच्या वतीने महाप्रसादाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या आकर्षक होत्या.
४ आरोग्य विभागाच्या वतीनेही भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी ७ ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत यांच्या देखरेखीखाली आरोग्य तपासणी केंद्र उघडण्यात आले होते. सहा रुग्णवाहिका तैनात होत्या. राज्य परिवहन महामंडळातर्फे भाविकांसाठी एसटीची सुविधा करण्यात आली.
४ भक्तजणांची पेयजल व्यवस्था म्हणून ठिकठिकाणी प्याऊ व नळयोजनेद्वारे पाण्याची सुविधा होती. तालुका प्रशासनाकडून सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. विशेष उल्लेखनिय म्हणजे यावेळी ध्वनीप्रदुषण नियंत्रणात करण्यात आले.
कार्यक्रमांमुळे पालकमंत्र्यांना उशीर
४खा.नाना पटोले व ना.राजकुमार बडोले मित्र परिवारातर्फे दरवर्षी संयुक्तरीत्या येथे महाप्रसादाचे वितरण केले जाते. दोघेही महाशिवरात्रीच्या दिवशी येथे आवर्जुन उपस्थित होवून महाप्रसाद वितरण करतात. शिवाय ते दिवसभर महाप्रसादाच्या शामियानात लोकांच्या भेटी घेत असतात. दोन वर्षापूर्वी ना.बडोले हे आमदार असताना दिवसभर वेळ देऊ शकत होते. मात्र आता पालकमंत्री असल्याने कार्यक्रमाच्या व्यापामुळे ते येथे दुपारी ३ वाजता पोहोचले. तत्पूर्वी ते नवेगावबांध व महागाव येथील कार्यक्रमात उपस्थित होते.
मुस्लीम बांधवांचीही रिघ
४मुस्लीम बांधवांनी ख्वाजा उस्मान गणी हारुणी यांचे दर्ग्यावर दर्शनासाठी रिघ लावली होती. महाशिवरात्रीचे दिवशी काही हिंदू बांधव दर्ग्यावर तर मुस्लीम बांधव महादेवाचे दर्शन घेत असल्याचे दृश्य येथे पहायला मिळते. यावरुन हिंदू-मुस्लीम ऐक्य भावनेच्या मनोमिलनाची प्रचिती येते. महाशिवरात्री पर्वावर किल्ल्यावर चढून या ऐतिहासिक पुराव्यांची पाहणी करतात. एरवी महादेव पहाडी व किल्ल्याची पाहणी करण्यासाठी अगदी तुरळक भक्तगण जातात.