मुंबई येथून एफडीआयची चमू शहरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST2021-04-25T04:29:34+5:302021-04-25T04:29:34+5:30
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अशात रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबिफ्लू औषधांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली ...

मुंबई येथून एफडीआयची चमू शहरात दाखल
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अशात रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबिफ्लू औषधांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे या औषधांचा काळाबाजार वाढण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीआयच्या) तीन अधिकाऱ्यांची चमू गोंदिया शुक्रवारी झाली. या चमूकडून मेडिकलची तपासणी केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने व रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची समस्या असल्याने बरेच नागरिक गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. तर काही जण कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच मेडिकलमधून औषध आणून घेत आहेत. कोरोनावरील उपचाराचा डोस हा हेवी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून औषधोपचार करणे जीवावरही बेतू शकते. तर केवळ लक्षणे असल्याने चाचणी न करताच औषधोपचार सुरू केल्याने या नागरिकांकडून कोरोनावरील औषधांची मागणी वाढली आहे. यामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांना औषधे मिळणे कठीण झाले आहे. गोंदिया शहरात मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनावरील औषधांचा तुटवडा आहे. रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबिफ्लू, फॅविफिवर ही औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांची ओरड वाढली आहे. कंपन्यांकडूनच या औषधांचा पुरवठा होत नसल्याने मेडिकल विक्रेते सुध्दा हतबल झाले आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तीन अधिकाऱ्यांची टीम शुक्रवारी गोंदिया येथे दाखल झाली. या चमूने गोंदिया शहरातील ठोक व चिल्लर औषध विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी देऊन औषध साठा आणि बिलांची पाहणी केली. तसेच आवश्यक सूचनासुध्दा मेडिकल विक्रेत्यांना केल्याची माहिती आहे.
...........
प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध नकोच
कोरोना बाधित रुग्णांना डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन व आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असल्याशिवाय कोरोनाचे औषध देऊन नये, प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्णांना औषधे विक्री करणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील अशा स्पष्ट सूचनासुध्दा केल्याची माहिती आहे.
...........
दोन दिवस केली पाहणी
मुंबईहून आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चमूने शुक्रवार आणि शनिवारी शहरातील विविध मेडिकलला भेट देऊन त्यांच्याकडील रेमडेसिविर इंजेक्शन, कोरोनावरील औषधांचा स्टॉक चेक केला तसेच आतापर्यंत विक्री केलेल्या औषधांची बिलेसुध्दा चेक केल्याची माहिती आहे. यामुळे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय आता कोरोनावरील औषधे देण्यास मेडिकल विक्रेते नकार देत आहेत.
..........