ममता सुपर बाजारवर एफडीएची कारवाई

By Admin | Updated: March 4, 2015 01:20 IST2015-03-04T01:20:58+5:302015-03-04T01:20:58+5:30

शहरातील ममता सुपर बाजारवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.

FDA action on Mamta Super Market | ममता सुपर बाजारवर एफडीएची कारवाई

ममता सुपर बाजारवर एफडीएची कारवाई

गोंदिया : शहरातील ममता सुपर बाजारवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी येथून खाद्य पदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहेत. तर ममता सुपरबाजारच्या संचालकांकडे रजिस्ट्रेशन व पॅकिंगचा परवाना नसल्याचे आढळले असून त्यावर त्यांना प्रशासनाने नोटीस बजावले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून १ मार्च रोजी रात्री ८ वाजता ही कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती डॉ.अशू सैनी यांनी मुख्य बाजार भागात असलेल्या ममता सुपरबाजारमधून हल्दीरामचे खाद्यपदार्थ व मसूर दाळ खरेदी केली होती. घरी गेल्यावर त्यांना त्यात बुरशी आढळून आली. यावर त्यांनी सुपर बाजारच्या संचालकांना विचारणा केली असता त्यांनी चूक मान्य न करता हुज्जत घातली. यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अन्न व औषध प्रशासनाचे प्रभारी सहायक आयुक्त (अन्न) बी.जी. नंदनवार यांना दुकानातील साहीत्य व कागदपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, नंदनवार यांनी अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.टी.घंवर, तहसीलदार संजय पवार तसेच वजन व माप विभागांच्या निरीक्षकांसह १ मार्च रोजी रात्री ८ वाजता दरम्यान ममता सुपरबाजारवर कारवाई केली. कारवाई दरम्यान त्यांना सुपरबाजारमध्ये मागील दीड वर्षांपासून पॅकिंग केली जात असल्याचे दिसून आले.
यावर त्यांनी दुकानाचे रजिस्ट्रेशन व पॅकींगचा परवाना मागीतला. मात्र दुकान संचालकांकडे ते नव्हते. यावर नंदनवार यांनी दुकानातून खाद्य पदार्थांचे न नमुने घेतले असून ते मुंबईला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. तर ममता सुपर बाजारच्या संचालकांना दुकान दोन-तीन दिवस बंद ठेवण्याचे मौखीक आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे ममता सुपर बाजारच्या संचालकांपासून परिसरातील अन्य व्यवसायीही त्रस्त असल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: FDA action on Mamta Super Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.