उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
By Admin | Updated: July 27, 2015 02:44 IST2015-07-27T02:44:28+5:302015-07-27T02:44:28+5:30
जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (दि.२५) शांततेत पार पडली असून रिंगणात

उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
गोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (दि.२५) शांततेत पार पडली असून रिंगणात असलेल्या ३०७५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला सोमवारी (दि.२७) होणार आहे. प्रत्येक तालुकास्थळावर या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने सर्वांच्या नजरा सध्या या मतमोजणीकडेच लागल्या आहेत.
१८१ ग्रामपंचायतींमधील ५६२ जागांसाठी जिल्ह्यात शनिवारी (दि.२५) निवडणूक घेण्यात आली. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३०७५ उमेदवार रिंगणात होते. ग्रामपंचायत हीच राजकारणाची पहिली पायरी म्हणून म्हटले जात असल्याने ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीला घेऊन निवडणुका असलेल्या भागांत तर वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या दिवसा शेती व रात्रीला प्रचार व भेटीगाठी असले समीकरण बसविले जात होते.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत २७९ उमेदवारांची अविरोध निवड झाली. या उमेदवारांच्या विरोधात कुणीच अर्ज न भरल्यामुळे त्यांची लॉटरीच लागल्याचे दिसले. यात सर्वाधिक ८३ उमेदवार देवरी तालुक्यातील असून ७३ उमेदवार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आहेत. तर उर्वरीत ३०७५ उमेदवारांसाठीची निवडणूक मात्र अटीतटीची दिसून आली. त्यातच सुमारे ७३.४० टक्के मतदान झाले.
शनिवारी झालेल्या मतदानानंतर निवडणुकीचा ज्वर काहीसा कमी झाला असला तरी आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याने आतापासून निकालांना घेऊन कार्यकर्ते वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात व्यस्त असल्याचे गावागावांत दिसून आले. या निकालांना घेऊन शहरातही उत्सुकता दिसून येत आहे.(शहर प्रतिनिधी)
तालुकास्थळावर होणार मतमोजणी
ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्यास्थळी होणार आहे. यासाठी तहसीलदारांना अधिकार देण्यात आले आहेत. मतमोजणीत सहा राऊंड होणार असून यासाठी १४ टेबल राहणार असल्याचे तसेच सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार असल्याचे गोंदियाचे तहसीलदार संजय पवार यांनी सांगीतले.