३०७५ उमेदवारांचे भाग्य यंत्रबद्ध
By Admin | Updated: July 26, 2015 01:53 IST2015-07-26T01:53:26+5:302015-07-26T01:53:26+5:30
जिल्ह्यातील शनिवारी झालेल्या १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३०७५ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये यंत्रबद्ध झाले.

३०७५ उमेदवारांचे भाग्य यंत्रबद्ध
ग्रामपंचायत निवडणूक : ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान, २७९ जण अविरोध
गोंदिया : जिल्ह्यातील शनिवारी झालेल्या १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३०७५ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये यंत्रबद्ध झाले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदान सुरूच होते. नागरिकांनी भरभरून मतदान केल्याने या मतदानाची टक्केवारी ८० ते ८५ टक्के होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
भातपिकाच्या रोवणीची लगबग सुरू असतानाच ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीने वातावरण ढवळून निघाले. १८१ ग्रामपंचायतींमधील ५६२ जागांसाठी झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३०७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे निवडणूक असणाऱ्या गावांमधील वातावरण गेल्या काही दिवसात ढवळून निघाले. दिवसभर शेतावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना गाठण्यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मतदानासाठी मतदारांना केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांनी स्पेशल गाड्या लावल्या होत्या. अनेकांना शेतावरून उचलून मतदानासाठी आणण्यात आले.
विशेष म्हणजे २७९ उमेदवारांची निवडणूक अविरोध झाली. त्यांच्याविरूद्ध कोणीच नामांकन दाखल केले नाही. त्यात सर्वाधिक ८३ उमेदवार देवरी तालुक्यातील असून त्याखालोखाल ७३ उमेदवार अर्जुनी मोरगाव तालुक्यात अविरोध निवडून आले.
१५ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर रिंगणात कायम असणाऱ्या सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अवघे १० दिवस मिळाले. त्यातच पाऊस सुरू झाल्याने रोवणीने वेग घेतल्याने एकीकडे रोवणीची धांदल तर दुसरीकडे निवडणुकीचा प्रचार अशा वातावरणामुळे उमेदवारांची तारांबळ उडत होती. गेल्या ४-५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. मतदारांना गाठण्यासाठी सकाळी ९ पर्यंत किंवा सायंकाळी ७ नंतर प्रचारकार्याला वेग येत होता.
नक्षलग्रस्त देवरी, सालेकसा तालुक्यात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होते. तरीही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. कुठेही अनुचित घटना घडली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मारहाण
कालीमाटी : आमगाव तालुक्यातील कालीमाटीवरून अर्धा किलोमीटरवर असलेल्या बंजारीटोला ग्रामपंचायतमध्ये शनिवारी मतदान केंद्रात दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे राजकीय प्रतिनिधी पारधी हे लोकांना आपल्या उमेदवारांना मतदान करा असे सांगून आमिष देत असल्याची शंका आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना टोकून त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे वादाला तोंड फुटले. मात्र हा वाद वाढतच गेला. शेवटी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काठीने राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या डोक्यावर मारले. त्यात ते जखमी झाले. मात्र लागलीच त्या मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.