पुलाजवळ जीवघेणा रस्ता
By Admin | Updated: July 22, 2015 02:08 IST2015-07-22T02:08:00+5:302015-07-22T02:08:00+5:30
कातुर्ली गावाजवळून राज्य शासनाचा चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता सितेपारपर्यंत पोहचला. मात्र रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे,

पुलाजवळ जीवघेणा रस्ता
आमगाव : कातुर्ली गावाजवळून राज्य शासनाचा चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता सितेपारपर्यंत पोहचला. मात्र रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे, त्याकडे बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. कातुर्ली कालव्यावरील पुलाजवळ डांबरीकरणाचा मोठा ढिग निर्माण झाला आहे. या ठिकाणी रात्रीला अनेकदा दुचाकीस्वारांचा अपघात होतो. मात्र प्रशासनाला अद्याप जाग आली नाही.
कलानवरगाव, कातुर्ली, सितेपारपर्यंत सदर डांबरीकरण रस्ता कोट्यवटी रूपये खर्चून तयार करण्यात आला. सितेपारनंतर पुढे हा मार्ग कुठे जाणार, याची साधी पुसट कल्पनाही कुणालाच नाही. करोडो रुपये खर्च करून तयार झालेला रस्ता दुरावस्थेत आहे. या रस्त्याच्या वाली कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कातुर्ली गावाजवळ डांबरीकरणाचा ढिग पुलाच्या दोन्ही बाजूला तयार झाला आहे. रात्री दुचाकी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ते एक आव्हान आहे. अनेक दुर्घटना या ठिकाणी झाल्या आहेत. अनेकांना दुखापत झाली. मात्र संबंधित प्रशासनाला तक्रार करूनही जाग आली नाही.
तयार करण्यात आलेला हा रस्ता नेमका कोणत्या गावावरून जाणार व प्रवाशांना किंवा नागरिकांना कोणता फायदा आहे, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. सध्या या रस्त्याचे काम पूर्णपणे बंद आहे. निधी उपलब्ध नाही किंवा समोर रस्ता नेणे कठीण आहे, याची कल्पना कुणालाच नाही. मात्र रस्त्याच्या दैनावस्थेमुळे सदर रस्ता दुचाकी प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे व दुर्दशा झालेल्या ठिकाणी दुरूस्ती करण्याची मागणी जैतवार गुरूजी, छोटू शहारे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)