उपोषणकर्त्याला रुग्णालयात हलविले
By Admin | Updated: December 16, 2014 22:54 IST2014-12-16T22:54:50+5:302014-12-16T22:54:50+5:30
आमरण उपोषणाला बसलेल्या इसमाला तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र निगरगट्ट प्रशासनाने सहाव्या दिवशीपर्यंत यावर तोडगा काढला नाही.

उपोषणकर्त्याला रुग्णालयात हलविले
अर्जुनी/मोरगाव : आमरण उपोषणाला बसलेल्या इसमाला तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र निगरगट्ट प्रशासनाने सहाव्या दिवशीपर्यंत यावर तोडगा काढला नाही.
बरडटोली येथील रवी व्यंकय्या कुदरूपाका यांनी विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरपासून स्थानिक पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली. अरविंद बोरकर यांच्या घरकुल प्रकरणात लाभार्थी व ग्रामसेवक जी.के.बावणे यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कुदरूपाका यांनी मागणी केली आहे.
पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जी.डी.कोरडे यांनी लाभार्थी बोरकर यांचेवर १० डिसेंबरपर्यंत तर ग्रामसेवक बावणे यांचेवर वरिष्ठांकडून परवानगी मिळाल्यानंतर पोलिसात तक्रार करण्याचे लेखी आश्वासन कुदरूपाका यांना दिले. मात्र कोरडे यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. यासाठी हे उपोषण आरंभण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात खंडविकास अधिकारी कोरडे यांची भूमिका संशयास्पद आहे. कोरडे यांचे या प्रकरणात हात ओले झाल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे. त्यांचेवर कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली आहे. ग्रामसेवक बावणे यांचा या प्रकरणातून बचाव करण्यासाठी हा संपूर्ण डाव रचला जात असल्याचे सांगण्यात येते. खंडविकास अधिकाऱ्यांनी बावणे यांचेवर कारवाई करण्याचा प्रस्ताव मार्गदर्शनासाठी वरिष्ठांकडे पाठविला आहे. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. (तालुका प्रतिनिधी)