दिवसभर शेतीकाम आणि रात्री निवडणूक प्रचाराचा जोर
By Admin | Updated: July 24, 2015 01:15 IST2015-07-24T01:15:33+5:302015-07-24T01:15:33+5:30
येत्या २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सालेकसा तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

दिवसभर शेतीकाम आणि रात्री निवडणूक प्रचाराचा जोर
ग्रामपंचायत निवडणूक : ८१ सदस्यांसाठी १६४ उमेदवार रिंगणात
विजय मानकर सालेकसा
येत्या २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सालेकसा तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यात ८१ सदस्य निवडून द्यायचे असून त्यासाठी १६४ महिला-पुरूष उमेदवारांनी मैदानात उडी घेतली आहे. यापैकी ४५ महिला आणि ३६ पुरूष सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे महिला उमेदवार मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
याचदरम्यान शेतीच्या रोवणीच्या कामालासुध्दा वेग आला आहे. त्यामुळे शेतीचे काम असो किंवा निवडणुकीचे, दोन्हीसाठी वेळ फार महत्वाचा असतो. शेतीची कामे वेळेवर झाली नाही तर उत्पादनावर परिणाम होईल तर दुसरीकडे वेळेवर मतदारांशी संपर्क केला नाही तर निवडणूक जिंकण्यावर परिणाम होईल. अशा परिस्थितीत उमेदवारांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. ते व्दिधा मनस्थितीत सापडले आहेत. यात महिला उमेदवारांची तर अग्निपरीक्षा होत आहे. परंतु ‘एक नारी सब पर भारी’ या म्हणीला सार्थक करण्याचे काम महिला उमेदवार करीत असताना दिसत आहेत. सर्वत्र रोवणीची कामे सुरू आहेत. यात जे निवडणूक लढवित आहेत. तेसुध्दा सहपरिवार कामात गुंतले आहेत. अशात महिला दिवसभर आपल्या शेतीत काम करीत आहेत. सायंकाळी घरी येवून लवकर स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, तयार होणे आणि आपल्या वार्डात ‘डोअर टू डोअर’ संपर्क करण्याचे काम सर्व नऊ ग्रामपंचायतीमध्ये करताना दिसून येतात. यात महिला उमेदवारच नाही तर ज्या ठिकाणी पुरूष उमेदवार आहेत, त्यांच्या पत्नीसुध्दा आपल्या पतीच्या विजयासाठी स्वेच्छेने घराबाहेर निघून मतदारांशी सतत संपर्क साधताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या कामात महिला आपल्या पुरूषावर कसल्याही प्रकारे अवलंबून न राहता आपल्या सोबत मोहल्यातील एक-दोन महिलांना घेऊन किंवा प्रभागाच्या पॅनेलमध्ये असलेल्या महिलांना घेवून पुरुष उमेदवारांच्या महिलांनासुध्दा एकत्र घेवून जनसंपर्क करीत आहेत. दिवसभर शेतीत काम करून तसे कोणीही थकून जातो आणि सायंकाळी लवकर जेवण करून सकाळी लवकर उठण्याच्या उद्देशाने लवकर झोपायला जातात. परंतु सध्या निवडणूक नादात रात्री ११, १२ वाजेपर्यंत त्या मतदारांशी संपर्क करून घरी येतात. दुसऱ्या दिवसाची योजना ठरवितात आणि मग झोपतात. दोन-तीन तास झोपल्यानंतर पहाटे लवकर उठून पुन्हा सकाळी स्वयंपाक करून शेतीच्या कामाला जातात.
हा सर्व क्रम चालत असताना महिला मुळीच थकलेल्या दमलेल्या दिसत नाहीत. अशा महिलांना पाहून वाटते की या महिलांमध्ये किती उर्जा भरलेली आहे. काही वर्षापूर्वीची कल्पना केली तर आपल्याला ग्रामीण भागात कोणतीही महिला पदाधिकारी स्वत: निर्णय न घेता पतीवर अवलंबून राहायची. परंतु आता त्या स्वयंनिर्णयासाठी सक्षम झालेल्या दिसत आहेत. महिलांना फक्त घराबाहेर निघण्याची संधी मिळाली तर भविष्यात त्यांना आरक्षणाची गरज भासणार नाही, असे वाटते.