धानाच्या दराने शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2015 00:07 IST2015-05-01T00:07:06+5:302015-05-01T00:07:06+5:30
लग्नसराईची लगबग तथा अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

धानाच्या दराने शेतकरी चिंताग्रस्त
गोंदिया : लग्नसराईची लगबग तथा अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यात पुन्हा धानाचे भाव गडगडल्याने शेतकरी तथा व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
पूर्व विदर्भात धानाचे प्रमुख पीक घेतले जात आहे. गोंदिया, भंडारा जिल्ह्यात शेतकरी धान पिकांच्या उत्पादनावरच वर्षभराचे नियोजन तयार करीत असतात. खरीप हंगामात उत्पादीत धानाची साठवणूक शेतकरी करीत असून मार्च अखेरीस कर्जाची परतफेड करण्यासाठी या धानाची विक्री करीत आहेत. बँका आणि सहकारी संस्थांचे क्रॉप लोन आदीचे देणे असल्याने शेतकरी या राशीची जुळवाजुळव करीत आहेत. दरम्यान गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रबी हंगामातील उत्पादनाचे होत्याचे नव्हते झाले आहे.
याच परिसरात धान उत्पादक शेतकरी सैरभैर झाला आहे. धानाचे भाव सध्या गडगडले आहे. कर्जाची परतफेड करायची असल्याने भाव नसतानाही शेतकऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. याच आर्थिक मंदीचा फटका व्यवसायीकांना बसला आहे. बाजारात खरेदी विक्रीवर मोठे संकट ओढवल्याचे चित्र दिसून येत आहे. व्यवसायीकांचे डोक्यावर हात आहेत. हे अच्छे दिन की बुरे दिन हे कळेनासे झाले आहे. धानाच्या भाव वाढीवरुन पेंढी जाळण्याचा अनुभव शेतकरी आणि नागरिकांना आहे. पंरतु लोकप्रतिनिधी शांत झाले असल्याने विरोधक जाब विचारत आहेत. ग्रामीण भागात विशेषत: अर्जुनी परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधीचा रक्तदाब वाढत आहे.
लग्नसराई तथा अन्य कार्यक्रमात लोकप्रतिनिधी हजेरी लावत आहेत. त्यांना धानाचे भाव गडगल्याचा एकच प्रश्न शेतकरी विचारत आहेत. केंद्र आणि राज्यात खासदार, आमदार एकाच पक्षाचे आहेत. धान उत्पादनावर जिल्हयातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सावरणारी आहे. त्यांचे वर्षभराचे आयुष्य याचे जनित याच उत्पादनावर धावत आहे. या मुद्दावर विरोधक बोलत असेल तरी उन्हाचे चटके बसून रस्त्यावर येण्याची सुरवात ते करीत नाहीत यामुळे शासन जागृत होत नसून शेतकऱ्यांत संताप आहे. मामा तलाव तथा शासकीय तलावाची अवस्था निधीअभावी वाईट झाली आहे. परिसरात सिंचनाचा चुराडा होत असताना लोकप्रतिनिधी, विरोधक आणि शेतकरी शांत असल्याने येणारे भवितव्य धोक्याची घंटी वाजविणारी आहे. (वार्ताहर)