शेतकरी वळले ॲझोला शेतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:27 IST2021-04-06T04:27:45+5:302021-04-06T04:27:45+5:30
तिरोडा : अदानी फाउंडेशन तिरोडा मार्फत तालुक्यातील २६ गावांमध्ये कामधेनू प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत पशुपालकांना मोफत कृत्रिम ...

शेतकरी वळले ॲझोला शेतीकडे
तिरोडा : अदानी फाउंडेशन तिरोडा मार्फत तालुक्यातील २६ गावांमध्ये कामधेनू प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत पशुपालकांना मोफत कृत्रिम रेतन, गर्भ परीक्षण, वांझपण निवारण, चारा प्रात्यक्षिक इत्यादी सुविधा थेट त्यांच्या दारापर्यंत पुरविल्या जातात. या प्रकल्पाचा उद्देश मुख्यत्वे पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करणे व देशी गोवंशाचा विकास करणे हा आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणून सत्र २०२०-२१ मध्ये अदानी पावर प्रमुख कांती बिश्वास यांच्या मार्गदर्शनात १२ गावातील २८ पशुपालकांना ॲझोला शेती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या अंतर्गत मोफत ॲझोला कल्चर, ग्रीन मॅट,प्लास्टिक, मिनरल मिक्स्चर व खत वाटप करण्यात आले.
ॲझोला ही वनस्पती शेवाळ या प्रकारात मोडत असून यामध्ये प्रथिने, विटामिन्स तसेच क्षार तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ॲझोला वनस्पतीचे उत्पादन घेण्यासाठी सावलीत खड्डा करून त्यावर प्लाॅस्टिकच्या आवरणाने आच्छादन करावे. त्यानंतर माती पसरून गाईचे शेण व सुपर फास्फेट पाण्यात मिसळून हे मिश्रण खड्ड्यामध्ये टाकले जाते. अशाप्रकारे तयार केलेल्या खड्ड्यात ॲझोला वनस्पती वेगाने वाढते व खड्डा १०-१५ दिवसात वनस्पतीने भरून जातो असे अदानी फाउंडेशन प्रमुख नितीन शिराळकर यांनी सांगितले. यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी मोफत दर्जेदार चारा उपलब्ध झाल्याने त्यांचा पशुखाद्याचा खर्च वाचला तसेच दुग्ध उत्पादनात सुद्धा १०-१५ टक्के वाढ झाली. येणाऱ्या वर्षांमध्ये जास्तीत जास्त पशुपालकांना ॲझोला शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल असेही शिराळकर यांनी सांगितले. या उपक्रमासाठी अदानी फाउंडेशनचे मिनेश कटरे तसेच अंमलबजावणी यंत्रणा बायफचे रुपेश कुकडे, सुमित बोरकर, गौरीशंकर अंबुले व मनोज डोमळे यांनी सहकार्य केले.