शेतकऱ्यांनी मका फेकला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:52+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानपिक घेतले जाते. पीक बदल व नगदी पिकाकडे शेतकºयांनी वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी मका लागवडीचा प्रयोग केला. बोंडगाव सुरबन, केशोरी, महागाव, पांढरवाणी, परसोडी या परिसरात मका लागवड झाली. पीक निघाले मात्र शासनाचे आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरूच झाले नाही.

शेतकऱ्यांनी मका फेकला रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : गोदाम भरल्याने बंद पडलेली मका खरेदी शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर बुधवारपासून (दि.१७) पुन्हा सुरू करण्यात आली. बुधवारी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका नवेगावबांधच्या आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आणून रस्त्यावर फेकला. दरम्यान वाटाघाटीनंतर प्रकरण निवळले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानपिक घेतले जाते. पीक बदल व नगदी पिकाकडे शेतकºयांनी वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी मका लागवडीचा प्रयोग केला. बोंडगाव सुरबन, केशोरी, महागाव, पांढरवाणी, परसोडी या परिसरात मका लागवड झाली. पीक निघाले मात्र शासनाचे आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरूच झाले नाही. आर्थिक चणचण असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी कमी दराने व्यापाऱ्यांना मका विकला. तर काही शेतकऱ्यांनी राजकीय बळाचा वापर केला. खा. प्रफुल्ल पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे दाद मागून शेतकºयांचा मका खरेदी करण्यास भाग पाडले होते. आदिवासी विकास महामंडळामार्फत केशोरी व गोठणगाव येथे खरेदी केंद्र सुरू झाले. अल्पावधीतच गोदाम भरल्याने खरेदी बंद पडली. बऱ्याच शेतकऱ्यांचा मका खरेदी केंद्रावर तर काहींचा घरातच पडून राहिला. पांढरवाणी, परसोडी परिसरातील शेतकऱ्यांना गोठणगाव, केशोरी केंद्रावर मका नेऊन विक्री करणे वाहतुकीच्या दृष्टीने परवडण्यासारखे नव्हते. शिवाय आधीच गोदाम खच्च भरलेले होते. त्यामुळे मका खरेदी बंद होती व शेतकऱ्यांजवळ मका पडून होता. १७ जूनपर्यंत महामंडळाने मका खरेदी न केल्यास पांढरवाणी, परसोडी परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका नवेगावबांधच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर आणून टाकण्याचा इशारा दिला होता. बुधवारी सकाळी शेतकरी ट्रॅक्टरमध्ये मका घेऊन नवेगावबांध येथे एकत्र आले. त्यांनी मका रस्त्यावर घातला. या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, यशवंत गणवीर, अनिल दहीवले, शिवाजी गहाणे, पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांनी मध्यस्थी केली.उपप्रादेशिक व्यवस्थापक राहुल पाटील यांनी गोदाम भाड्याने घेऊन नवेगावबांध येथील शासकीय गोदामात मका खरेदी करण्यास संमती दिली. त्यानंतर हे प्रकरण निवळले. मात्र पांढरवाणी, परसोडी भागातील शेतकऱ्यांचे धान घेतले जात नसल्याची ओरड सुरू आहे. गोदाम रिकामे नसल्याचे कारण सांगितले जात असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडली.