तीन राज्यांतील शेतकरी बाजारपेठेवर अवलंबून

By Admin | Updated: May 15, 2014 23:45 IST2014-05-15T23:45:11+5:302014-05-15T23:45:11+5:30

जिल्ह्याच्या सीमारेषेवर मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांची सुरुवात होते. गोंदियाची बाजारपेठ मोठी असून यात महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील लगतच्या जिल्ह्यातील

Farmers from three states are dependent on the market | तीन राज्यांतील शेतकरी बाजारपेठेवर अवलंबून

तीन राज्यांतील शेतकरी बाजारपेठेवर अवलंबून

गोंदिया : जिल्ह्याच्या सीमारेषेवर मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांची सुरुवात होते. गोंदियाची बाजारपेठ मोठी असून यात महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील लगतच्या जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतातील हिरवा भाजीपाला विक्रीसाठी पाठवतात. लग्नसराईमुळे भाजीपाल्यांना चांगली मागणी असल्यामुळे सध्या भाजी उत्पादक शेतकर्‍यांना सुगीचे दिवस आले आहेत.

या क्षेत्रातील गोंदिया ही एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे शहरालगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड तसेच गोंदियाच्या सभोवताल असलेल्या ग्रामीण परिसरातील शेतकरी गोंदियाच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. गोंदियाच्या बाजारपेठेत विविध माल/सामान आयात-निर्यात करणारे मध्यस्त आहेत. या मध्यस्थांद्वारे नागपूर, रायपूर, राजनांदगाव, दुर्ग, नाशिक व जवळपासच्या ग्रामीण परिसरातून हिरवा भाजीपाला मोठय़ा प्रमाणात आणण्यात येते. बाजारातील किरकोळ व्यापारी व खरेदी करून विक्री करीत असतात. गोंदिया हे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून छत्तीसगड व मध्यप्रदेशात मोठय़ा प्रमाणात प्रवाश्यांचे आवागमन होते.

शहरातील बाजारात हिरव्या भाजीपाल्यांचे दुसर्‍या जिल्ह्यातून व परप्रांतातून आगमन होते. बाजारातील लहान मोठे व्यापारी मध्यस्थांकडून तो भाजीपाला खरेदी करून विक्री करीत असतात. गोंदियाच्या बाजारात कारले व ढेमसे हे दुर्ग व राजनांदगाव येथून येतात. रायपूरवरून लाल बरबटी, दूधीभोपळा व काळी वांगी येतात. आलूंचे आगमन आग्रा व कानपूरवरून होते. नागपूरच्या बाजारातून काही मध्यस्थ गाजर, काकडी, बीट, शिमला मिरची, हिरवी वांगी, कोथींबीर व मिरची इत्यादी भाजीपाला गोंदियाच्या बाजारात आणतात.

काटोल व छिंदवाडा येथून फुलकोबी व कोथींबीर मोठय़ा प्रमाणात आणण्यात येते. गोंदियाच्या परिसरातील शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. त्याचबरोबर हिरव्या भाज्याही शहरातील बाजारपेठेत विक्रीस आणल्या जातात. खमारी, कटंगी, नागरा, तुमखेडा, सिंदीटोला या व इतर शहरालगतच्या गावांमध्ये हिरव्या भाज्यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. यात पालक, लाल, मेथी, चवळी व अन्य भाज्यांच्या समावेश आहे. हे शेतकरी भाजीपाला गोंदिया बाजारात विक्री करीत असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे.

मध्यप्रदेशातील शेतकरीसुद्धा गोंदियाच्या बाजारपेठेत एक श्रेष्ठ पर्याय समजतात. येथील काटी, बिरसोला व लांजी या गावातून गोंदियाच्या बाजारपेठेत भेंड्या मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत असतात. एका भाजीविक्रेत्याने सांगितले की, गोंदियाच्या बाजारात नाशिकवरून टमाटर, हावडा येथून परवल व नागपूर येथून आले-लसून विक्रीकरीता उपलब्ध होते. एकंदरीत गोंदियाची बाजारपेठ तिन्ही राज्यातील शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers from three states are dependent on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.