कर्ज वसुलीच्या तगाद्याने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: February 20, 2015 01:18 IST2015-02-20T01:18:46+5:302015-02-20T01:18:46+5:30
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. शेतीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित पिक हाती लागत नसल्यामुळे

कर्ज वसुलीच्या तगाद्याने शेतकरी त्रस्त
रावणवाडी : दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. शेतीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित पिक हाती लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक झाली आहे. अशातच विविध संस्थांकडून घेतलेले कर्ज कोणत्या रुपात फेडावे अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यातच त्यांच्याकडून कर्जवसुलीचा तगादा सुरू आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची लागवड, बियाणे, खत आदी खर्चासाठी विविध कार्यकारी संस्था, कोकण ग्रामीण बँक, पतसंस्था आदी यंत्रणेकडून कर्जाची उचल केली. मात्र या भागात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे पाण्याअभावी लागवड केलेले धान पिक शेतातच गडप झाले. गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रत्येक वर्षीच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाले. अशातच वित्तीय मदत करणाऱ्या यंत्रणा ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून चलअचल संपत्ती जप्तीची कारवाई करण्याचा इशारा शेतकऱ्यांना देत आहे. यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
यावर्षी खरीप हंगाम उशीरा सुरू झाला, त्यातच शेतकऱ्यांनी अल्पशा वेळात रोपे तयार केली. मात्र पिक हाती येण्याच्या शेवटी पावसाने हुलकावणी दिली. पिक वाचविण्याची शेतकऱ्यांना धडपड करावी लागली.
मात्र पुरेशे उत्पन्न हाती आले नाही. एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे संस्था, बँकांचा कर्ज वसुलीचा तगादा या मोठ्या संकटामुळे शेतकऱ्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. (वार्ताहर)