रब्बी धान खरेदी बंद शेतकरी आले अडचणीत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:50+5:302021-07-07T04:35:50+5:30
केशोरी : शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने सुरु असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रात रब्बी धान खरेदी करण्यासाठी मुदतवाढीची घोषणा केली ...

रब्बी धान खरेदी बंद शेतकरी आले अडचणीत ()
केशोरी : शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने सुरु असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रात रब्बी धान खरेदी करण्यासाठी मुदतवाढीची घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात संबंधित धान खरेदी केंद्रांना आदेश पाठविले नाही. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रात रब्बी हंगामातील धानाची खरेदी करणे बंद झाले. ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली शेतकऱ्यांची धान केंद्राच्या आवारात पडून आहे. शेतकरी वर्ग अडचणीत आले आहे.
धान खरेदीला मुदत वाढीचे आदेश संबंधित केंद्रांना पाठविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, इळदा या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रांना रब्बी हंगामातील धान खरेदी करण्याची मुदत ३० जूनपर्यंत होती. यावर्षी कोरोना संकटामुळे धान खरेदी केंद्र उशिरा सुरु झाल्यामुळे शासनाने घालून दिलेल्या मुदतीच्या आत धान खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची हजारो क्विंटल धान्य आधारभूत केंद्राच्या आवारात पडून आहेत. ही मागणी घेऊन शेतकरी खा. प्रफुुल्ल पटेल आणि आ. मनोहर चंद्रिकापुरे यांना भेटले. त्यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सदर मागणी संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला. त्याप्रमाणे शासनाने धान खरेदीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढविल्याची घोषणा केली. परंतु मुदतवाढीचे आदेश आधारभूत केंद्रांना प्राप्त झाले नाही. त्यामुळे धान खरेदी बंद केली आहे. ऑनलाइन नोंद केलेली हजारो क्विंटल धान केंद्राच्या आवारात पडली आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्ग फारच अडचणीत सापडला आहे.
..............
आदिवासी विकास महामंडळाने केले हात वर
या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी नवेगावबांध यांना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता शासनाने वाढवून दिलेल्या मुदतीचे आदेश माझ्यापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे मी काहीच करु शकत नाही असे म्हणून हात वर केले. याकडे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी विशेष लक्ष देऊन शासनाने धान खरेदीसाठी वाढवून दिलेल्या मुदतीचे आदेश संबंधित आधारभूत धान खरेदी केंद्रांना प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.