शेतकऱ्यांनी आतापासून सावध राहावे
By Admin | Updated: June 8, 2015 01:28 IST2015-06-08T01:28:09+5:302015-06-08T01:28:09+5:30
मृग नक्षत्र सात जूनपासून सुरू झाले आहे. ७ जूनला संपूर्ण जिल्ह्यात थोड्या प्रमाणात ढगाळलेले वातावरण होते.

शेतकऱ्यांनी आतापासून सावध राहावे
गोंदिया : मृग नक्षत्र सात जूनपासून सुरू झाले आहे. ७ जूनला संपूर्ण जिल्ह्यात थोड्या प्रमाणात ढगाळलेले वातावरण होते. वातावरणात दमटपणा असून केव्हाही पाऊस येण्याची चिन्हे दिसत आहेत. केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची बातमी असतानाही हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. मृग नक्षत्राच्या सुरूवातीला शेतकरी शेतीच्या कामांना सुरूवात करतो. परंतु आता कृषी कार्याला सुरूवात करावयास शेतकरी कचरत आहेत.
मागील महिन्यात ३१ मे रोजी अर्जुनी-मोरेगाव क्षेत्रात एक तास पाऊस पडला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या तापमानात दोन-तीन दिवस घट झाली होती. आता पुन्हा तापमान वाढू लागले असून पावसाचा एक थेंबसुद्धा जिल्ह्यात पडलेला नाही. अशात शेतकऱ्यांनी आपले कृषी कार्य विचारपूर्वक व सांभाळून सुरू करावे. अन्यथा नुकसान त्यांनाच सहन करावा लागेल.
बांधांमध्ये पर्याप्त पाणी नाही. त्यामुळे जर रोपवाटिका तयार करण्यात आल्या तर या रोपवाटिकांना वेळोवेळी पाणी देण्यासाठी बांधांचे पाणी पुरणार नाही. दासगाव येथील ५५ वर्षीय शेतकरी लखनलाल पटले यांनी सांगितले की, बालपणापासूनच ते शेती करीत आहेत. नऊतप्यातही त्यांनी पाऊस पडताना पाहिला आहे. तसेच मृग नक्षत्रातसुद्धा कुठे ना कुठे कमी-अधिक प्रमाणात पाऊस आला आहे. परंतु यावर्षी संपूर्ण नऊतप्यात जिल्ह्यात कुठेही पाऊस आला नाही. मृग नक्षत्रातसुद्धा कुठे पाऊस पडल्याचे ऐकिवात नाही. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच मान्सून कमजोर किंवा पाऊस लांबण्याच्या गोष्टी त्यांनी कधी जिल्ह्यात बघितल्या नाही, असे ते म्हणाले. या सर्व बाबी लक्षात घेवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्कतेने हवामान व कृषी विभागाच्या टिप्स लक्षात ठेवून आपले कार्य सुरू करणे हिताचे ठरेल.