शेतकरी बसले पुन्हा उपोषणावर

By Admin | Updated: December 16, 2015 02:05 IST2015-12-16T02:05:40+5:302015-12-16T02:05:40+5:30

न्याय मिळावा यासाठी मागील जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसलेल्या गोरेगाव ...

The farmers sat again on fasting | शेतकरी बसले पुन्हा उपोषणावर

शेतकरी बसले पुन्हा उपोषणावर

मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या
गोंदिया: न्याय मिळावा यासाठी मागील जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसलेल्या गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथील कोमलप्रसाद देवकरण कटरे या शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी समस्येचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नसून जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन फुसके बार ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे कटरे यांनी सोमवारपासून (दि.१४) पु्न्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला असून, आपल्या मागण्यांसदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.
कटरे यांनी भूमीअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार व अतिक्रमणकर्र्त्याच्या आडकाठी धोरणामुळेच त्रस्त होऊन भुमी अभिलेख अधिकारी व अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी व अतिक्रमण केलेली जमीन सरकार जमा करावी या मागणीसाठी जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेऊन १५ दिवसांच्या आत न्याय मिळवून देऊ असे लेखी आश्वासन दिल्याने कटरे यांनी उपोषण मागे घेतले होते.
त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गोरेगावचे संबंधित भूमी अभिलेख उपअधीक्षक यांना कटरे यांच्या प्रकरणाची योग्य चौकशी करुन समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. मात्र उपअधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करीत कसलीच कारवाई न करता न्यायालयाचे कसलेच आदेश नसताना कटरे यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणाला आता पाच महिन्यांचा कालावधी लोटत असून अतिक्रमणकर्त्यांने कटरे यांना शेतात जाऊ न दिल्याने यंदा खरीप हंगामात त्यांना पिक घेता आले नाही. तर याप्रकरणी स्थानिक तहसीलदारांना मौक्यावर येऊन पंचनामा करण्याची विनंती केली असता तहसीलदारांनी शेताकडे ढुंकृणही बघितले नाही.
परिणामी कटरे यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी कटरे यांच्यावर गुन्हा उपोषणावर बसण्याची वेळ आली असून अतिक्रमण करण्यात आलेली ०.४ आर जमीन सरकार जमा करावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या उपअधीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, पंचनामा न करणारे तहसीलदार यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन ते सोमवारपासून (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा बेमुदत उपोषणावर बसले आहेत.
विशेष म्हणजे कटरे यांच्या शेतात जाणाऱ्या मार्गाजवळच्या ०.१४ हे.आर. सरकारी जमिनीवर द्वारकाप्रसाद दमाहे यांनी अतिक्रमण केले आहे. तर भूमीअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हात ओले करुन जमीन दमाहे यांच्या नावाने देखील करुन दिली आहे.
त्यामुळे त्या जमिनीवर हक्क दाखवून दमाहे कटरे यांना शेतात जाण्यास मज्जाव करीत आहे. एवढेच नव्हे तर दमाहे यांनी गहेलाटोला ते जानाटोला मार्गावरील सरकारी जमिनीवर देखील अतिक्रमण करुन शेतकऱ्यांवर मज्जाव करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे कटरे यांचे दोन वर्षांपासून पिकांचे नुकसान होत आहे.

Web Title: The farmers sat again on fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.