लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बियाणे व शेतीची इतर कामे करण्यासाठी आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून शासन आणि नाबार्ड अंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यंदा जिल्हा बँकेने २४० कोटी ८० लाख रुपयांचे वाटप खरीप हंगामात केले होते. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी २०५ कोटी रुपयांचे पीक कर्ज भरले.
राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकेच्या तुलनेत जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया सुलभ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल ही जिल्हा बँकेतून करतात. खरीप हंगामात जिल्हा बँकेने जिल्ह्यातील ४२८६७ शेतकऱ्यांना एकूण २४० कोटी ८० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले होते. पीक कर्जाची परतफेड करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च असते. या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केल्यास व्याजात सवलत मिळते व पुन्हा नवीन पीक कर्जाची उचल करणे सोपे जाते. बरेच शेतकरी ही डेडलाईन पाळतात. सोमवारी (दि. ३१ मार्चपर्यंत) जिल्ह्यातील पीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांनी २०५ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची परतफेड केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या घोषणेचा झाला परिणामलोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळेल या आशेने पीक कर्जाची परतफेड केली नाही. त्याचा परिणाम पीक कर्ज परतफेडीवर झाल्याची माहिती आहे.