संकटातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
By Admin | Updated: October 22, 2015 02:47 IST2015-10-22T02:47:16+5:302015-10-22T02:47:16+5:30
शेतकरी चहुबाजूंनी संकटात सापडलेला आहे. मात्र चार दिवसांपूर्वी राईस मिलर्सच्या कार्यक्रमासाठी गोंदियात

संकटातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
गोंदिया : शेतकरी चहुबाजूंनी संकटात सापडलेला आहे. मात्र चार दिवसांपूर्वी राईस मिलर्सच्या कार्यक्रमासाठी गोंदियात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी कोणतीही घोषणा केली नाही. उलट बोनसवर विसंबून राहू नका, असे ठणकावले. मात्र उद्योजकांना स्वस्त वीज, मिलिंगच्या दरात वाढ करून वाहतूक दरातही वाढ देण्याचे संकेत दिले. त्यामुळे हे सरकार उद्योजकांचे असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीच, असा सूर मान्यवरांनी ‘लोकमत व्यासपीठा’वरील चर्चेत लावला.
सद्यस्थितीत शेतकरी भिषण संकटात उभा आहे. पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव व अवर्षणामुळे शेतपिक घरी येते की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊनही शेतकऱ्यांच्या हिताचे काहीच असे सांगितले नाही. शेतीच्या उत्पादनावर, त्यांच्या किमती व शेतकऱ्यांवर वाढणाऱ्या कर्जाचा बोजावर बोलायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. शेतकऱ्यांकडे असे दुर्लक्ष करणे ही दु:खद बाब आहे.
- उषाताई मेंढे
अध्यक्ष, जिल्हा परिषद
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दिड पट भाव देऊ असे घोषणापत्रात लिहून भाजपने राज्य व केंद्रात सत्ता मिळविली. परंतु आता हे सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर बोलायलाही तयार नाही. शेतमालाला भाववाढ देणे आवश्यक आहे. तुरीची डाळ २०० रु. किलो आहे. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांना होत आहे. तांदळाच्या जिल्ह्यात येऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक शब्दही न बोलणे ही शोकांतिका आहे.
- गंगाधर परशुरामकर
जि.प.गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस
राज्य शासनाने गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कागदावर पैसेवारी चांगली दाखविली असली तरी प्रत्यक्षात देवरी तालुक्यातील चिचगड, ककोडीसारख्या भागात जाऊन पाहिले तर खरी परिस्थिती दिसते. जिल्ह्याला एक मंत्री लाभलेले असतानाही शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारला कळत नाही. हे सरकार उद्योगपतींचेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन केवळ उद्योजकांचाच फायदा पाहिला आहे.
- सहेसराम कोरोटे
जिल्हा महामंत्री, काँग्रेस
उद्योजकांना तुपाशी ठेऊन शेतकऱ्यांना उपाशी ठेवणाऱ्या सरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. या सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही. नवीन योजना आणल्या नाही. सगळीकडे दुष्काळ असताना जिल्ह्यात मुख्यमंत्री येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासंबधात न बोलणे ही बाब मनाला खटकणारी आहे. शेतकऱ्यांचा वापर फक्त मतांसाठी केला जातो.
धनीराम भाजीपाले
आदर्श शेतकरी, झिलमिली
नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
४ अंगावर कर्जाचा डोंगर, त्यातच यावर्षी अवर्षणाचा फटका बसल्याने हातात येणाऱ्या अल्प पिकातून उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न असताना कर्ज फेडणे शक्यच नाही, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने बुधवारच्या सकाळी ७.३० वाजता शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हेमराज टेंभरे (३८) रा.नोनीटोला असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.