हसारा येथे शेतकऱ्याने केली फुलांची शेती
By Admin | Updated: March 30, 2016 02:03 IST2016-03-30T02:03:34+5:302016-03-30T02:03:34+5:30
नगदी पीक घेण्याकरिता हातात पैसा नाही. धान शेती तोट्याची आहे. रब्बी पिकांनंतर प्रायोगिक तत्वावर केवळ २५ डिसमिल शेतात फुलांची शेती करण्याला सुरुवात

हसारा येथे शेतकऱ्याने केली फुलांची शेती
बाजारात केवळ ११ रुपये किलोचा भाव : प्रायोगिक तत्त्वाची शेती तोट्यात
गोंदिया : नगदी पीक घेण्याकरिता हातात पैसा नाही. धान शेती तोट्याची आहे. रब्बी पिकांनंतर प्रायोगिक तत्वावर केवळ २५ डिसमिल शेतात फुलांची शेती करण्याला सुरुवात भंडारा जिल्ह्यातील हसारा येथील एका शेतकऱ्याने केली. परंतु फुलांचे व्यापारी किंमत कमी देत असल्याने या शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडली आहे.
हसारा येथील रामपाल राऊत यांची तुसमर तालुक्यात हसारा-हिंगणा रस्त्यावर शेती आहे. यावर्षी धानचे पीक हातून गेले. शेतात विहीर व मोटारपंप असल्याने आपण ही प्रायोगिक तत्वावर फुलांची शेती करावी असे रामपाल यांना वाटले. केवळ २५ डिसमिल शेतात (एका बांधीत) झेंडू व अन्य जातीच्या फुलांची शेती रामपाल यांनी लावली. फुलांची शेती केवळ ३ ते ४ महिने इतकीच असते. एका आठवड्यातून तीन ते चारदा फुल तोडून बाजारात रामपाल विक्री करीता नेतात. सध्या फुल विक्रेते केवळ ११ रुपये प्रती किलोग्रॅमचा भाव देत आहेत.
फुल विक्रेत्यांकडून सर्वसामान्य ग्राहक गेला तर ८० रुपये प्रति किलोग्रॅम विक्री करतात. त्यामुळे रामपाल यांची निराशा झाली. फुलांच्या शेतीचा खर्च, देखरेख, उन्हाळ्यात फुल शेतीला पाणी देणे, फुल तोडीचा खर्च वजा जाता काहीच मिळत नाही. असे रामपाल यांनी सांगितले. शासनाकडून काहीच मदत या शेतीला मिळत नाही. कुणी कृषी अधिकारी सुद्धा भेट देत नाही. एक मात्र खरे उन्हाळ्यात या रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष मात्र ही फुल नक्कीच खेचून घेतात. या फुल शेतीला शासनाने मदत करण्याची गरज आहे.