अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित
By Admin | Updated: December 13, 2014 01:40 IST2014-12-13T01:40:10+5:302014-12-13T01:40:10+5:30
गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला.

अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित
मुंडीकोटा : गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे शासनाने अतिवृष्टीच्या नुकसानीकरिता अनुदान जाहीर केले. अशावेळी अनेक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली, पण काहींना दीड वर्षे लोटूनही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
अतिवृष्टीचा अनुदान साझा तलाठ्यामार्फत तयार करुन संबंधित शेतकऱ्यांना बँक पासबुकांच्या झेरॉक्स, तसेच शेतकऱ्याची मृत्यू झाल्यास वारसान प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पूर्ण करुन शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे दिले. काही शेतकऱ्यांनी आपल्या नावाचे खाते क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्यात आले. अशाच प्रकारे मुंडीकोटा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे दिली. या सर्व बाबीला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपर्यंत अनुदान जमा झाले नाही. शेतकरी याबाबत तहसील कार्यालय व तलाठ्यांकडे वारंवार विचारणा करीत आहेत. पण त्यांना बरोबर उत्तरे दिली जात नसल्याने शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने जे अनुदान मंजूर केले, तेही दीड वर्षापासून दिले नाही. शेतकरी वेळोवेळी बँकेत येवून खात्यात रक्कम जमा झाली काय? असा प्रश्न बँकेतील व्यवस्थापकांना विचारत असतात. पण अनुदान शासनाकडून आलेच नाही तर बँकेत कसे जमा होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांनी वरिष्ठांनी चौकशी करुन त्वरित रक्कम बँकेत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)